वाशी : आपला देश डॉ. होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्त्रज्ञांच्या योगदानामुळेच पुढे जात आहे. यापुढेही देशातील सामाजिक समस्यावर मात करण्यासाठी युवा वैज्ञानिक घडणे गरजेचे असल्याचे सांगत हे काम गुरूजनांनी करावे, असे आवाहन अॅड. धीरज पाटील यांनी केले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये जिल्हास्तरीय इन्सपायर्ड अॅवार्ड सन २०१५ चे उद्घाटन जि. प. अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष सुधाकर गुंड होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, महिला बाल कल्याण सभापती लता पवार, पं. स. सभापती मनिषा घुले, जि. प. सदस्य प्रशांत चेडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बिभीषण खामकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढत असल्याचे सांगत सर्व शाळांत ई-लर्निंगसाठी उपक्रम सुरू करण्यासाठी जि. प. च्या फंडातून १० लाख रूपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचेही अॅड. पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, जि. प. सदस्य प्रशांत चेडे, उबाळे यांनीही भाषणे झाली. जिल्हास्तरीय इन्सपायर अॅवार्ड विज्ञान प्रदर्शनात ४३३ इन्सपायर अॅवार्ड मिळवणारे बाल वैज्ञानिक सहभागी झाले असून, २५ स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी उकिरडे यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मानले. हे प्रदर्शन दोन दिवस चालणार असून, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी, मुख्याध्यापक परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमासाठी आलेल्या शिक्षणप्रेमीना बसण्याची व्यवस्था मात्र शिक्षण विभागाने केलेली नव्हती. (वार्ताहर)
गुरुजींनी युवा वैज्ञानिक घडवावेत
By admin | Published: September 14, 2015 11:47 PM