एच. एम. देसरडा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:42 PM2017-09-03T23:42:41+5:302017-09-03T23:42:41+5:30
खंडपीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आलेले अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांना रविवारी सिडको पोलिसांनी संत तुकाराम नाट्यगृहाबाहेरून ताब्यात घेतले.
लोकम्ात न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आलेले अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांना रविवारी सिडको पोलिसांनी संत तुकाराम नाट्यगृहाबाहेरून ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या नातवालाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेऊन तीन तास बसवून ठेवले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ग्वाही देणाºया न्यायालयाच्या कार्यक्रमातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचा आरोप करीत डाव्या परिवर्तनवादी संघटनांनी निषेध व्यक्त केला.
संत तुकाराम नाट्यगृह येथे रविवारी सकाळी ११ वाजता औरंगाबाद खंडपीठ वर्धापन दिनाच्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी प्रा. देसरडा हे नातवांसोबत दाखल झाले. रिक्षातून ते उतरत नाही तोच त्यांना पोलिसांनी अडविले. कार्यक्रम हा निमंत्रितांसाठीच आहे. त्यामुळे तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. तर नागरिकांसाठी हा कार्यक्रम खुला असल्याचे प्रा. देसरडा म्हणत होते.
कारण सांगितले नाही
खंडपीठाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले होते. माझा नातू हा लॉचा विद्यार्थी आहे. त्यामुळे त्याच्यासोबत मी कार्यक्रमासाठी जात असताना पोलिसांनी कोणतेही कारण न सांगता ठाण्यात आणले. रिक्षातून उतरत नाही, तोच पोलिसांनी घेरले. बळजबरीने मला ठाण्यात आणले. नातवाला जाऊ द्या म्हटले तरी ऐकले नाही. वकील संघाच्या वतीने काय पत्र देण्यात आले की, ज्यामुळे मला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले, याची पोलिसांनी माहिती दिली नाही. त्यासंदर्भातील कोणते पत्रही देण्यात आले नाही. परंतु मी या पत्राची मागणी पोलिसांकडे केली आहे. - प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ
निमंत्रितांसाठीच कार्यक्रम
खंडपीठाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा निमंत्रितांसाठीच होता. वकीलांनाच कार्यक्रमाचे निमंत्रण होते आणि ज्यांना कार्यक्रमास उपस्थित राहायचे होते, त्यांनी आमची परवानगी घेणे आवश्यक होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कार्यक्रमास आले होते. त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाºया कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. अनोळखी लोकांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे पत्र पोलिसांना दिले होते. प्रा. देसरडा यांनी आमच्याशी संपर्क केला असता तर त्यांना प्रवेश निश्चित मिळाला असता. कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रश्नच नव्हता.
- अॅड. आनंदसिंह बायस, सचिव,
औरंगाबाद खंडपीठ वकील संघ
ताब्यात घेतले आणि सोडले
प्रा. देसरडा यांना या कार्यक्रमास
प्रवेश देऊ नका, अशी विनंती उच्च न्यायालय बार असोसिएशनने पोलिसांना केली होती. याबाबतचे पत्रही पोलिसांना त्यांनी दिले होते. प्रा.देसरडा हे कार्यक्रमस्थळी आल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना तुम्हाला कार्यक्रमास उपस्थित राहता येणार नाही, असे बजावले. तेव्हा त्यांनी कार्यक्रमास जाण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी त्यांना सांगितले की, बार असोसिएशनने केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्याचे कळविले आहे. तुम्ही निमंत्रित नसल्याने तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे सांगून त्यांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांना ठाण्यात नेण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले.
-कैलास प्रजापती, पोलीस निरीक्षक, सिडको पोलीस ठाणे.