वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अमरावतीचे पथक वाळूज शिवारात दाखल झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे.
वाळूज शिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास काही शेतकरी आपल्या शेतात गेले असता बप्पा सरोदे यांच्या शेतात एक हरिण मृतावस्थेत दिसून आले. गत काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्यामुळे हरणाची शिकार बिबट्यानेच केली असावी, असा संशय व्यक्त करीत शेतकऱ्यांनी दौलताबाद वनविभागाचे वनक्षेत्रपाल एस.वाय. गवंडर, वनरक्षक मनोज कांबळे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. दरम्यान, वाळूज शिवारात बिबट्याने हरणाची शिकार केल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी श्रीरंग आरगडे या शेतकऱ्यास दुचाकीवरून जात असताना बिबट्याने दर्शन दिले होते.
या घटनेनंतर आठवडाभरापूर्वी राजू गायकवाड यांच्या शेतात या बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला होता. या परिसरात अधून-मधून बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे शेतीकामासाठी जाणारे शेतकरी व मजुरांत भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे घाबरलेल्या नागरिक व शेतकऱ्यांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केल्यामुळे सोमवारी या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.
सकाळी घटना आली समोर वाळूज शिवारात सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्याचे आज सकाळी शेतकऱ्यांना दिसून आले. या घटनेमुळे भयभित झालेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर मंगळवारी सकाळी वनक्षेत्रपाल एस.वाय. गवंडर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मनोज कांबळे, वनमजूर प्रभू हजारे, बाबूलाल गुंजाळ, साहेबराव तुपे, मच्छिंद्र देवकर आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पहिल्बिबट्याने हरणाची मान घट्ट पकडून हरिण निपचित पडल्यानंतर त्याचा फडशा पाडल्याचे वन विभागाच्या पथकाला दिसून आले. या मृत हरणाला ताब्यात घेऊन दौलताबाद येथे शवविच्छेदन करण्यात आल्याचे वन क्षेत्रपाल गवंडर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शिकारीसाठी बिबट्याचा प्रवासया परिसरात बिबट्याकडून कुत्रे, तसेच वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाकडून सोमवारी पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात कुत्रा ठेवून दोन वन मजुरांना घटनास्थळी हजर ठेवण्यात आले होते; मात्र बिबट्याने पिंजरा लावलेल्या ठिकाणी न जाता जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हरणाचा फडशा पाडल्याचे दिसून आले. बिबट्या रात्रीच्या वेळी पैठण परिसरातून शिकारीच्या शोधात वाळूज परिसरात येत असल्याचा अंदाज आहे. हा परिसर निर्जन असून, शिकार सहज मिळत असल्याने, तसेच लपण्यासाठी जागा असल्यामुळे बिबट्या वाळूज परिसरात येत असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
आज पुन्हा लावणार पिंजराअमरावतीच्या रेस्क्यू पथकाचे प्रमुख अमोल गावनेर, चंद्रकांत मानकर, सतीश उमक यांनी मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रेस्क्यू वाहनासह वाळूज परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू पथकाने खास रणनीती आखली असून, बुधवारी या ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असून, या पिंजऱ्यात बकरी ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर पैठण शिवारात तीन बिबट्यांचा वावर असल्याची चर्चा असल्यामुळे या पथकाकडून पैठण शिवारातही बिबट्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बिबट्याला जेरबंद करेपर्यंत या रेस्क्यूपथकाचा वाळूज व पैठण परिसरात मुक्काम राहणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.