भूखंड माफियांचा कहर; पाझर तलावात टाकली जातेय प्लॉटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 07:49 PM2019-09-06T19:49:38+5:302019-09-06T19:55:03+5:30
पिचिंगचे दगडही जाताहेत चोरीला
वाळूज महानगर : वडगावच्या पाझर तलावात चक्क प्लॉटिंग पाडली जात असून, काही लोकांनी सिमेंट खांब रोवून संरक्षक भिंतीचे काम सुरूकेले आहे. याकडे जिल्हा प्रशासनासह सिंचन विभागाने लक्ष देण्याची मागणी सजग नागरिकांतून केली जात आहे.
१९७२ मध्ये शासनाने पाझर तलावाची निर्मिती केली. यावेळी शासनाने तलावात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला दिला; परंतु तलावात गेलेली जमीन सातबाऱ्यावरून कमी झाली नाही. विशेष म्हणजे संबंधित जि.प.च्या सिंचन विभागाने तलावाची हद्दही निश्चित केलेली नाही. यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीने सिंचन विभागाला पत्रव्यवहारही केला आहे; परंतु ग्रामपंचायतीच्या या पत्राकडे सिंचन विभागाने लक्ष दिले नाही. तलावात गेलेल्या जमिनीवर काही जण सातबाऱ्याच्या आधारे मालकी हक्क सांगत असून, त्यावर प्लॉटिंग पाडली जात आहे. सध्या साजापूर रस्त्यावर तलावातच बिनधास्तपणे प्लॉटिंग टाकली जात आहे. तलावात काहींनी प्लॉटिंग करून संरक्षण भिंती बांधून घेतल्या आहेत. २०१२-१३ मध्ये ग्रामपंचायतीने ५ लाख रुपये खर्च करून तलावाची उंची वाढविली होती. तसेच पाळूला दगडाची पिचिंग केली होती; परंतु मुरूममाफिया तलावातील मुरमाबरोबरच पाळूचे दगडही घेऊन जात आहेत. भविष्यात मोठा पाऊस झाल्यास पाळू फुटून तलावातील पाणी गावात शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे तलावातील अतिक्रमण रोखण्याची गरज आहे. या विषयी सरपंच उषा एकनाथ साळे म्हणाल्या की, ग्रामपंचायतीने सिंचन विभागाकडे तलावाचे क्षेत्र मोजून देण्याची मागणी केली आहे; परंतु सिंचन विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही.
तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका
तलावालगत अनेक कंपन्या झाल्या आहेत. यातील अनेक कंपन्यांचे सांडपाणी तलावात सोडले जात आहे. आता तर तलावातही प्लॉटिंग पाडली जात आहे. कंपन्या व नागरी वसाहतींचे सांडपाणी तळ्यात सोडले जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका आहे, असे तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा साळे यांनी सांगितले.
शासनाने लक्ष घालावे
भांगसीमाता गड, साजापूर या वरच्या भागातून येणारे पाणी तलावात साचत होते. तलावामुळे गावाला पाणी मिळत होते. अतिक्रमणामुळे तलावातील जागा संपत चालली आहे. शासनाने ठोस उपाययोजना करावी, असे माजी उपसरपंच सुनील काळे यांनी सांगितले.