गंगापूर : गटशिक्षणाधिऱ्यांनी काढला आदेश
गंगापूर : विद्यार्थ्यांशिवाय १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून, ५० टक्के शिक्षकांनाच उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना मुख्यालयी राहणे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी बंधनकारक केल्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. या आदेशाची कितपत अंमलबजावणी होते, याकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शासनाच्या ७ ऑक्टोबर २०१६ च्या निर्णयानुसार शिक्षकांना नोकरीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे; मात्र तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या असलेल्या एकूण २३४ शाळांपैकी १७५ म्हणजे साधारण ७५ टक्के शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक हे औरंगाबाद व इतर ठिकाणाहून ये-जा करतात. त्यानुषंगाने लोकप्रतिनिधी, पालक व नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत गट शिक्षण अधिकाऱ्यांनी १४ जून रोजी केंद्र प्रमुखांना पत्र पाठवून शिक्षकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे, तसेच सदरील आदेशानुसार ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव व याविषयी एकंदरीत तपशील पंचायत समिती कार्यालयात १९ जून पूर्वी सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
आदेशाची कितपत अंमलबजावणी होणार
कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी शासन स्तरावरून वेळोवेळी काढलेले आदेश कागदावरच विरले असून, प्रत्यक्षात शासनाच्या सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. इतर ठिकाणाहून ये-जा करणारे शिक्षक सदरील आदेशाला गांभीर्याने घेऊन त्याची अंमलबजावणी करणार का? शिक्षक संघटना काय भूमिका घेणार? किंवा या आदेशाला केराची टोपली दाखवली जाणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.