- साहेबराव हिवराळे
वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : औद्योगिक क्षेत्रातील हंगामी कामगारांना कारखान्याकडून आरोग्यसेवा दिलीच जात नाही. तात्पुरते प्रथमोपचारावरच वेळ मारून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. गंभीर आजारदेखील कागदोपत्रीच दाखविल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रात महिला कर्मचारी संख्या अधिक असून, पाळणाघराची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
कारखान्यात प्रशिक्षित कामगारांची संख्या कमीच ठेवून हंगामी कामगारांकडून कामे करून घेण्यावर सध्या भर आहे. कटकटी नको म्हणून ठेकेदारांना कामाचा बोजा विभागून दिला आहे. प्रशिक्षित कामगार मशीनवर काम करीत असेल तर त्याला साथसंगत करताना हंगामी कामगारही जॉबवर्क तयार करतो; परंतु कारखान्यात सुरक्षा साधने व आरोग्यसेवेत हंगामी (कंत्राटी) कामगार कोसोदूर राहिला आहे. कोणत्यातरी खाजगी दवाखान्यात आरोग्यसेवा कागदोपत्री दिली जात असल्याचा आरोप हंगामी कामगारांतून होत आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्र हे जगाच्या नकाशावर नावारूपाला आले असून, देश-विदेशात येथील उत्पादने पाठविली जातात; परंतु कामगारांच्या सुरक्षा व आरोग्याविषयी मोठी अवहेलना केली जाते. कामगार कोणताही असो त्याची आरोग्य तपासणी किमान वर्षातून एकदा व्हावी, अशी महाराष्ट्र कामगार कायद्यात तरतूद आहे. त्याची उघड उघड पायमल्ली कारखान्याकडून होते आहे.
नाममात्र कामगारांची राज्य कामगार विमा आरोग्यसेवेची नोंदणी केली जाते. भविष्य निर्वाह निधी व इतर फायद्यापासून देखील हे कामगार वंचित राहत आहेत. अनेकदा ठेकेदाराकडे हक्काचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगारांना दमदाटी केली जाते. त्यामुळे अनेकांचे पैसे आणि कामही मिळत नसल्याचे प्रकार वाढले आहेत. काही अप्रिय घटना घडल्यावरच मग गहजब होतो.
कामगारांना आरोग्य सेवा हवीकामगार हंगामी असो की प्रशिक्षित, कामगारांना कामगार नियमानुसार आरोग्यसेवा देणे बंधनकारक आहे, तरीदेखील ठेकेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देत नाही, असे युनियनचे अनिल जाभाडे यांनी सांगितले.
आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी कारखान्याचीचआरोग्यसेवा ही कामगारांना देणे गरजेचे आहे, महिलांसाठी पाळणाघराचा नियम आहे. कामगार कायद्यात ही तरतूद आहे. सुरक्षा व आरोग्यसेवेबद्दल देखील कारखानदारांनी लक्ष देण्याची जबाबदारी कारखानदाराची आहे, असे औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी स्वप्नील देशमुख यांनी सांगितले.
नियमांचे पालन व्हावेकामगाराला कामावर घेताना त्याची नोंद रीतसर ठेवलीच पाहिजे, कोणत्या पद्धतीचे काम करीत आहे. त्याचीदेखील माहिती असणे गरजेचे आहे. कामगारांना किमान वेतन आणि सेवा देण्यावर कारखानदार व कंत्राटी ठेकेदारांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे कामगार उपायुक्त पौळ म्हणाले.
कामगार नियमांचे पदोपदी उल्लंघनकामगारांना काम करताना मार लागला तर दवाखान्यात नेऊन प्रथमोचार केले जातात. गंभीर आजाराप्रसंगी तर पदोपदी नियमांचे उल्लंघन करण्यात येते. त्याकडे आरोग्य, सुरक्षा विभागाने लक्ष द्यावे, असे अभाछावा श्रमिक संघटनेचे जगदीश हिवराळे म्हणाले.
अनेकांकडे आयडी कार्डच नाहीपोटाची खळगी भरण्यासाठी कारखान्यात मिळेल ते काम करणार्यांची संख्या मोठी आहे. त्या कामगार व कुटुंबियाला आरोग्यसेवा मिळवून दिली पाहिजे; परंतु अनेकांकडे स्वत:चे कामगार विमा योजनेचे ओळखपत्र (आयडी) देखील नाही. त्यांना सेवा मिळतील कशा? असा प्रश्न ईएसआयधारक कामगार संघटनेचे सचिव प्रकाश जाधव यांनी उपस्थित केला.