औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेसाठी ( Health Dept Exam:) रविवारी कोणी नंदुरबारहून आले, कोणी परभणीहून, तर कोणी जालन्याहून; पण परीक्षेची वेळ होईपर्यंत अनेकांना औरंगाबादेतील केंद्रेच सापडली नाहीत. गल्लीबोळातील केंद्र शोधताना अनेकांना मोबाइलमधील ॲपने गोलगोल फिरविले( confusion over finding center) . परीक्षा देण्यासाठी उमेदवारांसह पालकांना अक्षरशः धावाधाव करावी लागली. केंद्राच्या गोंधळामुळे अन्य जिल्ह्यातील उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. सकाळच्या सत्रातील परीक्षेला तब्बल ५४ टक्के उमेदवार मुकले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘गट - क’मधील औरंगाबाद मंडळातील २२ संवर्गातील १६० रिक्त पदे भरण्यासाठी ६८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यासाठी ३०,९०८ अर्ज आले होते. मे. न्यासा कम्युनिकेशनच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या सत्रात १० ते १२ या वेळेत १४,३८३ उमेदवार परीक्षा देणार होते. प्रत्यक्षात ६,४७५च आले. औरंगपुरा, खाराकुंवा येथे एकाच नावाची दोन वेगळी केंद्रे होती. नावाच्या गोंधळात केंद्र शोधताना अन्य जिल्ह्यांतील उमेदवारांची दमछाक झाली. नोडल अधिकारी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर वाकळे यांनी काम पाहिले. उपसंचालक (शुश्रूषा) डॉ. सुनीता गोल्हाईत, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रदीप कुलकर्णी यांनी केंद्रांना भेटी दिल्या. आरोग्य उपसंचालक कार्यालयात सहायक रवी इराळे यांनी नियंत्रण कक्षात काम केले.
दुपारच्या सत्रातील ३६ टक्के उमेदवार गैरहजरदुपारच्या सत्रात १६ हजार ५९० उमेदवार परीक्षा देणार होते. सकाळच्या तुलनेत दुपारी उपस्थिती अधिक राहिली. एकूण १० हजार ४७६ जणांनी परीक्षा दिली. तर, ३६ टक्के म्हणजे ६ हजार ११४ उमेदवार गैरहजर राहिले.
का झाला केंद्रांचा गोंधळ?उमेदवाराने ज्या विभागातील पदासाठी अर्ज केला, त्यास त्या मंडळातील परीक्षा केंद्र देण्यात आले. म्हणजेच उमेदवार ज्या विभागात नोकरी करू इच्छितो, त्या विभागात त्याने परीक्षा देणे अपेक्षित असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. ही बाब माहीत असूनही परीक्षेसाठी बाहेरच्या उमेदवारांनी ऐन परीक्षेच्या दिवशी सकाळी औरंगाबाद गाठले आणि त्यातून केंद्राची शोधाशोध करण्याची वेळ ओढावली.
कोरोनाबाधित युवतीने दिली परीक्षावाळूज महानगर परिसरातील एका केंद्रावर एका कोरोनाबाधित युवतीने पीपीई किट घालून परीक्षा दिली. औरंगाबादेत परीक्षा सुरळीतपणे पार पडली, असे डाॅ. प्रदीप कुलकर्णी, डाॅ. मनोहर वाकळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील स्थितीअर्ज प्राप्त-३०,९७३उपस्थित--१६,९५१गैरहजर-१४,०२२
नगर कसे गाठणार?परीक्षा देणाऱ्या मित्राला घेऊन जालन्याहून दुचाकीवरून आलो. खाराकुंवा येथील गुजराती विद्यामंदिरचे केंद्र शोधताना मोबाइल ॲप कधी पुढे जा म्हणत होते, कधी मागे फिरा म्हणत होते. मित्राला दुपारच्या पेपरसाठी अहमदनगरचे केंद्र देण्यात आले. सकाळच्या परीक्षेनंतर तेथे पोहोचणे अशक्य झाले.- योगेश पाटील
रिक्षाचालकाची मदतपरभणीहून रेल्वेने आलो. मित्राचे परीक्षा केंद्र गुजराती कन्या विद्यालयात होते. आधी आम्ही गुजराती विद्यामंदिरात गेलो. तेथे केंद्र दुसरे असल्याचे कळले. केंद्रावर पोहोचण्यासाठी रिक्षाचालक अलीम बेग यांनी मदत केली.- चंद्रकांत गायकवाड
रात्री हाॅलतिकीट मिळालेपरीक्षेसाठी जालन्याहून मुलाला घेऊन आलो. मुलाचे हाॅलतिकीट रात्री उशिरा मिळाले. त्याची प्रिंट काढता येत नव्हती. त्यात सकाळी वेळ गेला. बदनापूर येथे प्रिंट काढली आणि परीक्षा केंद्र कसेबसे गाठले.- हमीद खान गनी खान