Lok Sabha Election 2019 : शांतीगिरी महाराजांच्या गैरहजेरीत जय बाबाजी परिवाराची आ.जाधव यांना साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:23 PM2019-04-11T23:23:49+5:302019-04-11T23:24:38+5:30
जय बाबाजी परिवाराने लोकसभा निवडणूक मैदानातील अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली.
औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर गुरुवारी मठाशी निगडित असलेल्या जय बाबाजी परिवाराने लोकसभा निवडणूक मैदानातील अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याची भूमिका वेरूळ येथे पत्रकार परिषदेत जाहीर केली. विशेष म्हणजे ही घोषणा परिवार आणि राजकीय समितीने केली असून, यावेळी शांतीगिरी महाराज यांची उपस्थिती नव्हती.
मठाचे सचिव रामानंद महाराज यांनी सांगितले, परिवाराने पाठिंबा जाहीर केला ही महाराजांची भूमिका नाही; परंतु त्यांच्या परवानगीने हे घडले आहे. महाराज ओझर येथे अनुष्ठानाला असल्यामुळे ते गैरहजर होते. दरम्यान, प्रचारप्रमुख राजेंद्र पवार यांनी आ. जाधव यांचे मोबाईलवरून शांतीगिरी महाराज यांच्याशी बोलणे करून दिल्याचा दावा केला. यावेळी उमेदवार आ. जाधव यांनी युतीचे उमेदवार विद्यमान खा. चंद्रकांत खैरे सक्षम नसल्याचा आरोप केला, केंद्रातील अनेक योजना त्यांना जिल्ह्यात आणता आल्या नसल्याचेही ते म्हणाले. काकासाहेब गोरे, झुंबर मोडके, राजाभाऊ पानगव्हाणे, साहेबराव आगळे, रवींद्र घोडके, शेकनाथ होळकर आदींची यावेळी उपस्थिती होती. कुठलेही मानधन न घेता परिवाराचे ५० वाहने प्रचारात उतरणार आहेत. हा निर्णय फक्त औरंगाबादपुरता मर्यादित असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
१ लाख ४० हजार सदस्य ठरणार गेमचेंजर
जय बाबाजी परिवाराचे १ लाख ४० हजार सदस्य आहेत. हे सदस्य मठाशी निगडित असून ते गेमचेंजर ठरतील, असा दावा प्रचारप्रमुख पवार यांनी केला. आ. जाधव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत. पाणीपुरवठा, शहर स्वच्छता, कचऱ्यामुळे संभाजीनगरची (औरंगाबादची) बदनामी झाली. जाती-पातीचे राजकारण सुरू झाले आहे, उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी वाढत आहे. सामाजिक एकोपा संपला आहे. शेतकरी त्रस्त असून, ग्रामीण रस्त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. विद्यमान खासदाराने कामे केली नाहीत काय? ते युतीचे उमेदवार आहेत, मोदींनाच पाठिंबा देणार आहेत. २० वर्षांत त्यांनी काही नाही केले का? यावर पवार म्हणाले, आजवर खैरेंनाच पाठिंबा दिला; परंतु यावेळी परिवाराशी चर्चा, पाहणी केल्यानंतर मतदान वाया जाऊ नये म्हणून आ.जाधव यांना सात कलमी मागण्यांच्या आधारे पाठिंबा दिला आहे. जय बाबाजी परिवारात जास्तीचे सदस्य मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे त्यांचा दबाव होता म्हणून पाठिंबा दिला काय? यावर पवार म्हणाले, हा सर्वसमावेशक चर्चेअंती निर्णय झाला आहे.