सुप्रिया सुळेंकडे गाऱ्हाणे मांडताच काकूच्या उपचारासाठी धडपडणाऱ्या तरुणाला मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:34 PM2022-04-19T18:34:03+5:302022-04-19T18:35:03+5:30
मोहन देवरे या तरुणाने गर्दीतून मार्ग काढीत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी केलेला अर्जच त्याने सुळे यांच्या हातात दिला.
औरंगाबाद : ब्रेन हॅमरेजमुळे खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या काकूच्या उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाच दिवसांपासून एक तरुण चकरा मारत होता. सोमवारीही तो रुग्णालयात आला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या. खासदार सुप्रिया सुळे आल्याचे कळताच त्याने त्यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले. खासदार सुळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचना केली आणि अखेर त्याच्या अर्जावर स्वाक्षरी झाली. मोठ्या आनंदाने तो तरुण जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडला.
जिल्हा रुग्णालयातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप झाले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रदीप कुलकर्णी, नीलेश राऊत, विजय कान्हेकर, शिवराज केंद्रे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर खासदार सुळे या कारकडे जात होत्या. त्याच वेळी मोहन देवरे या तरुणाने गर्दीतून मार्ग काढीत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी केलेला अर्जच त्याने सुळे यांच्या हातात दिला. परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. तेव्हा खासदार सुळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. मोतीपवळे यांना बोलावून घेतले आणि तरुणाची अडचण सोडविण्याची सूचना केली. कार्यक्रमानंतर या तरुणाच्या अर्जावर काही मिनिटांतच स्वाक्षरी करण्यात आली. ‘लोकमत’शी बोलताना मोहन देवरे म्हणाला, १३ तारखेपासून रुग्णालयात येत आहे. सुटी आहे, मॅडम नाही, सर नाही, असेच सांगण्यात येत होते. डाॅ. मोतीपवळे म्हणाले, कोणाचीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न केला जातो. मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी अर्ज करण्याची ही प्रक्रिया नियमित आहे.
मास्क...मास्क...
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. तेव्हा मास्क नाही, मास्क नाही, असे वारंवार खासदार सुळे सांगत होत्या.