- श्यामकुमार पुरेसिल्लोड : शहरातील नगर परिषद प्रभाग क्रमांक १२मध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिल्लोड शहरात सेनेचा ऐतिहासिक विजय झाला आहे (The historic victory of the shiv sena in the Congress stronghold). शिवसेना उमेदवार फातमाबी जब्बारखान पठाण यांचा १,६३० मतांनी विजय झाला असून, त्यांना २०१९ मते मिळाली. तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रसच्या उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली.
निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पठाण कैसरबी बनेखा यांना ३८९ मते मिळाली. भाजपच्या छायाबाई मिसाळ यांना तर केवळ २१० व काॅंग्रेसच्या उमेदवार शेख जकीया अकबर यांना फक्त ५३ मते घेता आली. राष्ट्रवादीच्या उमेदवार शेख फरीदा बेगम यांनी केवळ २६ मते घेतली. राष्ट्रीय पक्षाची येथे वाताहत झाली आहे. मुस्लिम व सर्व समाजाचे मतदार राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मागे उभे असल्याचे या निवडणुकीत दिसले. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना येथे चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत याच प्रभागात काँग्रेसच्या उमेदवार ५०० मतांनी निवडून आल्या होत्या. तेव्हा अब्दुल सत्तार हे काॅंग्रेसमध्ये होते. तर या पोटनिवडणुकीत काँग्रेसला तीन अंकी मतेसुद्धा मिळवता आली नाहीत.
सिल्लोडमध्ये अन्य पक्ष केवळ नावापुरतेआगामी दोन महिन्यांत सिल्लोड येथील बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्या आहेत. महाराष्ट्रात काँगेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची आघाडी होऊ शकते. मात्र, त्याला सिल्लोड अपवाद ठरल्यास आश्चर्य वाटू नये. कारण, सिल्लोडमध्ये नगर परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांचे पानिपत झाले. हे शिवसेना पक्षप्रमुखांना दाखविण्यास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना पुरेसे आहे. मतदार संघावर असलेली पकड, लोकांची नाळ ओळखण्याची क्षमता व विकासाच्या जोरावर अब्दुल सत्तार यांनी हा विजय खेचून आणला आहे.
सोयगाव पॅटर्न राबविला जाईल का ?सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत भाजपने शिवसेनेला चांगली लढत दिली. निकाल काही लागो, मात्र केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे, भागवत कराड यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार यांना बळ दिले. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली, असे चित्र सिल्लोड तालुक्यातील आगामी निवडणुकीत दिसणार का? की पुन्हा अब्दुल सत्तार व रावसाहेब दानवे यांची मैत्री रंग आणते. याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.