हौसेला मोल नाही, शंकरपटाचा राजा 'साई' बैल विकला १७ लाख ५१ हजारांत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:36 PM2022-05-11T19:36:47+5:302022-05-11T19:37:53+5:30

बैलजोडीने गेल्या वर्षभरात हिंगोली, वाशीम, जालना, बुलढाणा, नानेगाव (सिल्लोड), घटांब्री या सहा ठिकाणी आयोजित केलेल्या शंकरपटात सहभाग घेऊन पहिला क्रमांक पटकावला होता.

Hobby is not worth it, the king of Shankarpat 'Sai' bull sold for 17 lakh 51 thousand | हौसेला मोल नाही, शंकरपटाचा राजा 'साई' बैल विकला १७ लाख ५१ हजारांत

हौसेला मोल नाही, शंकरपटाचा राजा 'साई' बैल विकला १७ लाख ५१ हजारांत

googlenewsNext

- रऊफ शेख
फुलंब्री (औरंगाबाद) :
तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्याच्या साई आणि लक्ष्या या बैल जोडीने अनेक शंकरपट गाजवले आहेत. यातील साई बैलाची १७ लाख ५१ हजार रुपयांत विक्री झाली आहे. पुणे जिल्ह्यातील प्रतीक भोसले नामक शेतकऱ्याने मंगळवारी हा बैल खरेदी केला आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेत बैल विक्री होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे हौसेला मोल नसल्याचे यातून दिसून आले.

फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील सांडूखा राजेखा (मिस्त्री) हे गेल्या अनेक वर्षांपासून शंकरपटात भाग घेण्यासह त्याकरिता लागणारे तांगे (छकडे)सुद्धा तयार करतात. या क्षेत्रात त्यांची तिसरी पिढीही आलेली आहे. त्यांनी तयार केलेले तांगे राज्यात सर्वत्र प्रसिद्ध असून, छकडावाले म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कोठेही शंकरपट असला तर ते बैलजोडीसह भाग घेतात. त्यांच्या बैलजोडीने गेल्या वर्षभरात हिंगोली, वाशीम, जालना, बुलढाणा, नानेगाव (सिल्लोड), घटांब्री या सहा ठिकाणी आयोजित केलेल्या शंकरपटात सहभाग घेऊन पहिला क्रमांक पटकावला होता. 

यामुळे त्यांच्या बैलांची सगळीकडे चर्चा होती. त्या बैलांची ख्याती ऐकूनच पुणे जिल्ह्यातील चारोळी (ता. हवेली) येथील प्रतीक भोसले यांनी तब्बल १७ लाख ५१ हजार रुपये मोजून यातील एक बैल विकत घेतला. प्रतीक भोसले हे शंकरपटाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या यात सहभागी होत आल्या आहेत. त्यांच्याकडे चार बैलांची जोडी असून. प्रत्येक शंकरपटात ते सहभागी होतात. तळेगाव येथील बैलजोडीची चर्चा ऐकूनच आपण हा बैल खरेदी केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

अनेक शंकरपट जिंकले
आमच्या शंकरपटाच्या दोन बैलांपैकी एका बैलाची आम्ही विक्री केली आहे. हे बैल गेल्या तीन वर्षांपासून आमच्याकडे होते. त्यांना दररोज दहा लिटर दूध, अंडे, बदाम, उडिद डाळ, शाळू ज्वारीचा चारा तसेच हिरवा चारा दिला जात होता. यामुळे त्यांनी अनेक शंकरपट आम्हाला जिंकून दिले.
- सांडूखाॅ राजेखाॅ, शेतकरी

Web Title: Hobby is not worth it, the king of Shankarpat 'Sai' bull sold for 17 lakh 51 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.