औरंगाबाद : चालू आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. दुसरीकडे विधानसभेचे अधिवेशनही सुरू असल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, सर्व विभागांचे कामकाज रोजच्यासारखेच सुरू आहे.
जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे यंदा वेळेच्या आत प्राप्त निधीचे नियोजन होऊ शकले नाही. बांधकाम, सिंचन, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण आदी विभागांची कोट्यवधी रुपयांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाअखेर निधी खर्च झाला पाहिजे, यासाठी आता कुठे अधिकारी- कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे.
दुसरीकडे विधानसभेचे अधिवेशन सुरू असून, कोणत्याही वेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती सादर करण्याचे फोन येऊ शकतात. म्हणून या महिन्यात २९ रोजी महावीर जयंती, ३० मार्च रोजी गुड फ्रायडे, १ एप्रिल रोजी रविवारी व शनिवार सोडला तर तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत; पण जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही नेहमीप्रमाणे कार्यालय सुरू राहील, असे फर्मान सोडल्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
प्राप्त निधी अखर्चित राहणार नाही, या अनुषंगाने जिल्हा परिषदेंतर्गत सर्व विभागांनी मार्चअखेरपर्यंत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी पाटील डोणगावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी विविध विभागांच्या आढावा बैठकांमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना के ल्या आहेत. त्यासाठी सार्वजनिक सुट्यांही रद्द करण्यात आल्या आहेत. आज गुुरुवारी महावीर जयंतीची सुटी होती. उद्या गुड फ्रायडेची सुटी आहे, तर रविवारी आठवडी सुटी आहे. या सुट्यांमध्येही जिल्हा परिषदेचा कारभार नियमित सुरू राहणार ओह. आज जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, या सर्व विभागांत अधिकारी-कर्मचारी कामात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळाले.