वाळूज महानगर : सिडको प्रशासनाकडे मागणी करुनही हॉटेल बंद होत नसल्याने मद्यपीच्या उपद्रवाने त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी सोमवारी रात्री हॉटेलवर हल्लाबोल केला. संतप्त जमावाने सुरक्षा रक्षकासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बेदम चोप देत हॉटेलची तोडफोड केली. या घटनेत दुचाकीसह हॉटेलचे नुकसान झाले आहे.
सिडको वाळूज महानगरात साईलीला बिअर बार अॅण्ड रेस्टॉरन्ट या नावाने हॉटेल आहे. ते बंद करावे यासाठी परिसरातील नागरिकांनी सिडको प्रशासनासकडे मागणी केली आहे. अर्ज, विनंत्या करुनही हॉटेल बंद होत नसल्याने त्रस्त झालेल्या ६० ते ७० नागरिकांचा जमाव सोमवारी रात्री साडेनऊ पावणेदहा वाजेच्या सुमारास अचानक हॉटेलमध्ये घुसला. जमावाने हॉटेलमध्ये घुसून तोडफोड करायला सुुरुवात केली.
यावेळी सुरक्षा रक्षक व हॉटेलमधील कर्मचाºयांनी जमावला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने सुरक्षा रक्षक व कर्मचाºयाला चोप देवून पिटाळून लावले. त्यानंतर जमावाने टेबल, खुर्च्या, ग्लास, शोसाठी लावलेल्या काचेची तोडफोड करीत हॉटेलमधील बिअरच्या बाटल्या फोडून टाकल्या. यावेळी जमावातील काही तरुणांनी दुचाकीचीही (एमएच - २०, बीजी - ४६८९) तोडफोड केली. काही वेळानंतर जमाव येथून निघून गेला. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान ,नागरिकांनी केलेल्या तोडफोडीत दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा हॉटेल चालक गणेश साळुंके यांनी केला आहे.
दरम्यान, सिडको वाळूज महानगर १ मध्ये चार बिअर बार आहेत. नागरी वसाहतीमधील सर्व बार बंद होणे आवश्यक आहे. पण राजकीय द्वेषातून काही मंडळी ठराविक बिअर बारलाच लक्ष करुन त्याला विरोध करित असल्याचा काही नागरिकांचा आरोप आहे. याप्रकरणी वाळूज महानगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता...........................सुरक्षा रक्षकासह पाच कर्मचाºयांना मारहाणहॉटेलचे सुरक्षा रक्षक मनोज आसवले, कर्मचारी मंगेश पवार, मयुर देवरे, रविंद्र गायकवाड, गणेश शेळके, गजानन देवरे यांना संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. यात मनोज आसवले, मयूर देवरे यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत.