घरोघरी लक्ष्मीपूजनाने घुमले मांगल्याचे सूर, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत शुभेच्छांची देवाणघेवाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 05:29 PM2023-11-13T17:29:48+5:302023-11-13T17:31:00+5:30
शहरात सर्वत्र सर्व मंगलमय वातावरण
छत्रपती संभाजीनगर : घरांवर लटकविलेले आकाश कंदिल, विद्युत रोषणाईच्या लखलखाटात न्हाऊन निघालेले शहर... लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी दिसलेला श्रीमंतीचा थाट... मनोभावे लक्ष्मीचे पूजन करून ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत, एकमेकांना आलिंगन देत दिलेल्या शुभेच्छा... फटाक्यांचा गगनभेदी दणदणाट करीत बच्चे कंपनीने केलेली धमाल आणि सहपरिवार मनसोक्त फराळाचा घेतलेला आस्वाद... रविवारी रात्रीचे हे दिवाळीचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय ठरले. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगरात सर्वत्र मंगलमय वातावरण होते.
अंधार दूर करून जीवनाला प्रकाशमान करणारा ‘दीपोत्सव’ रविवारी शहरवासीयांनी धूमधडाक्यात साजरा केला. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्यानगरीत परतले होते, तो हाच दिवस लक्ष्मीपूजन म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीची पूजा करून तिचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, धन, धान्य, आरोग्य, समृद्धी प्राप्तीसाठी सर्वांनी सायंकाळी प्रार्थना केली. यानिमित्ताने सर्व परिवार एकत्र आला. घरांच्या दरवाजावर झेंडूच्या माळा लावण्यात आल्या होत्या. संध्याकाळी ७ वाजेपासून शहरात आतषबाजी करण्यास सुरुवात झाली. रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान तुफान आतषबाजी बघण्यास मिळाली. रॉकेट जेव्हा आकाशात फुटे, तेव्हा जणू काही असंख्य रंगीबेरंगी तारे आपल्या दिशेने येत असल्याचा भास होई.
सायंकाळपर्यंत खरेदी उत्साहात
लक्ष्मीपूजनाच्या दोन तास आधीपर्यंत म्हणजे सायंकाळी ४ ते ४:३० वाजेपर्यंत बाजारपेठेत खरेदी उत्साहात सुरू होती. रेडिमेड कपड्यांच्या शोरूममध्ये कपडे खरेदी केले जात होते. मात्र, साड्यांच्या दालनात गर्दी ओसरलेली दिसून आली. लहान मुलांच्या कपड्यांच्या शोरूममध्येही हीच परिस्थिती होती. रविवारी फटाके खरेदी, झेंडू, शेवंती, पूजेचे साहित्य खरेदीवर बहुतेकांनी भर दिला.
मोंढ्यात गादीपूजन, लक्ष्मीपूजन
मोंढ्यात तसेच जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याच्या अडत दुकानांत व्यापाऱ्यांनी सायंकाळच्या मुहूर्तावर गादीपूजन, वहीपूजन, झाडू (लक्ष्मी) पूजन केले. यावेळी खतावणी, गणपती, लक्ष्मी, सरस्वतीचे छायाचित्र असलेली लाल रंगाची वही, कॉम्प्युटरची स्टेशनरी, कोऱ्या नोटांचे बंडल ठेवण्यात आले होते. व्यापाऱ्यांनी दुकानात दिवे लावले व घरी लक्ष्मीपूजन केले.