औरंगाबाद : घरगुती स्तरावर उद्योग करणाऱ्या अनेक महिला उद्योजक त्यांच्या उत्पादनांचे पॅकिंग पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच करतात. या पारदर्शक पिशव्यांमधून आतील वस्तू स्पष्टपणे दिसत असल्यामुळे वस्तूंची गुणवत्ता लगेच कळते, त्यामुळे ग्राहकांचेही समाधान होते आणि ते चटकन त्या वस्तू विकत घेतात; पण आता मात्र प्लास्टिक पिशव्यांवरच बंदी येणार असेल, तर आमच्या वस्तूंचे मार्केटिंग करावे कसे आणि या वस्तू पॅक करण्यासाठी काय वापरावे, असा प्रश्न घरगुती स्तरावर व्यवसाय करणाऱ्या अनेक महिला उद्योजकांना पडला आहे.
राज्य शासनाने प्लास्टिकच्या ज्या वस्तूंवर बंदी घातली आहे, त्यामध्ये कॅरिबॅग आणि पॅकेजिंग बॅगचाही समावेश असल्यामुळे महिला उद्योजक विचारात पडल्या आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे घरगुती स्तरावर तयार होणाऱ्या शेवया, पापड, लोणची, वाळवण या पदार्थांची विक्री तेजीत आहे. महिलांकडून किंवा बचत गटांकडून या वस्तू पारदर्शक प्लास्टिकच्या बॅगमध्ये आकर्षक रीतीने पॅक करून विविध दुकानांत विक्रीसाठी दिल्या जातात. चव घेऊन पाहण्यापेक्षा अनेकदा ग्राहक या वस्तू दिसायला कशा आहेत, हे पाहूनच पदार्थांची गुणवत्ता ठरवतो आणि विकत घेतो; पण आता पॅकेजिंग बॅगवर बंदी आल्यामुळे या वस्तू विविध दुकांनामध्ये विकायला ठेवायच्या कशा, याबाबत संभ्रम आहे.
कागदी बॅगमध्ये वस्तू पॅक केल्यामुळे ग्राहकांना आतील वस्तू नेमकी कोणत्या दर्जाची आहे हे समजत नाही आणि प्रत्येक वेळी ग्राहकासमोरच सर्व गोष्टी पॅक करून देणे उद्योजकांना अडचणीचे ठरते. तूप, दही, धूप, उदबत्ती, विविध मसाले, चटण्या, सरबते, जॅम, जेली, विविध प्रकारचे पीठ, कलाकुसरीच्या वस्तू अशा सर्वच वस्तू तयार करणाऱ्या उद्योजकांपुढे प्लास्टिकअभावी पॅकिंगचा प्रश्न उभा आहे.
पुनर्प्रक्रिया होणाऱ्या बॅगची निर्मिती करावीस्वत:च्या उत्पादनांसाठी ज्यांच्याकडे दुकाने आहेत, असे उद्योजक प्लास्टिकशिवाय त्यांच्या वस्तू पॅक करू शकतात. त्यांना प्लास्टिकवर बंदी घातल्याने मोठी अडचण येणार नाही; पण आम्हाला आमचे उत्पादन अनेक दुकानांमध्ये विक्र्रीसाठी द्यावे लागते.
काम कसे करावे हा प्रश्न अनेकजणी प्रदर्शनांमध्येही त्यांचे उत्पादन ठेवतात. आता प्लास्टिकबंदीमुळे हे काम कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. यासाठी पुनप्रक्रिया होऊ शकणाऱ्या पारदर्शक प्लास्टिक बॅगची निर्मिती होणे आवश्यक वाटते. - कुमुदिनी जाहगीरदार