औरंगाबाद : शहरातील किमान तापमानात मंगळवारी एकाच दिवसात १.४ अंशाने घट झाली आणि यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी किमान तापमानाची मंगळवारी नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर आज सकाळी तापमान आणखी खाली जात शहरात तीन दिवसांत तब्बल ६.६ अंशाने तापमानात घसरण झाली. त्यामुळे औरंगाबादकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
शहरात गेल्या तीन दिवसांत किमान तापमानात झपाट्याने घट झाली. २३ जानेवारी रोजी १५.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. दुसऱ्याच दिवशी सोमवारी किमान तापमानाचा पारा १०.२ अंशांपर्यंत घसरला. मंगळवारी त्यात आणखी घसरण झाली आणि हुडहुडी भरविणाऱ्या थंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. दरवर्षी जानेवारीत नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे. वाढलेल्या थंडीने सायंकाळनंतर शहरातील वाहतूक आणि बाजारपेठेतील वर्दळीवरही परिणाम दिसून येत आहे. हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर म्हणाले, दोन दिवसांपूर्वीच्या धुळीच्या वादळामुळे थंडीत वाढ झाली. परंतु, आता आज, बुधवारपासून थंडी कमी होण्याची शक्यता आहे.
वातावरणातील बदलाने बालके, ज्येष्ठ त्रस्ततापमानाचा पारा घसरत असल्याने अशा वातावरणात अनेक जण आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकल्याने नागरिक हैराण होत आहेत. वातावरणातील बदलाने हा त्रास होत आहे की, कोरोनाची लागण झाली, अशा शंकेने नागरिक रुग्णालयात धाव घेत आहेत. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठांना थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नीचांकी तापमानाचा यापूर्वीचा रेकाॅर्डशहरात जानेवारी महिन्यात यापूर्वी १९६८ मध्ये रेकाॅर्डब्रेक किमान तापमानाची नोंद झालेली आहे. १७ जानेवारी १९६८ रोजी शहरातील तापमान १.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यानंतर जानेवारीत इतके कमी तापमान कधी खाली गेलेले नाही. जानेवारीत २०२१ मध्ये १२.८, २०२० मध्ये ८.१, २०१९ मध्ये ७.०, २०१८ मध्ये ९.२ इतक्या किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेचे हवामान सहायक सुनील निकाळजे यांनी दिली.