औरंगाबाद : आरोप करायचे त्यांना करू द्या, माझ्यावर ईडीची कुठलीही कारवाई झालेली नाही आणि होणारही नाही. त्याचा मी जास्त विचारही करत नाही असे रोखठोक मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडले. सध्या परिवहन मंत्री परब औरंगाबाद दौऱ्यावर असून पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी भाजपकडून ईडी चौकशीबाबत सातत्याने होणाऱ्या आरोपांवर भाष्य केले. ( I am not at risk of ED - Anil Parab)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता. त्याच्या आधारावर ईडीने देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यांच्या घरी छापे टाकून खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. आता ईडीने देशमुख यांच्या पत्नीला सुद्धा नोटीस दिली आहे. दरम्यान, भाजपाने ईडीच्या तपासंवरून महाविकास आघाडीवर सातत्याने निशाणा साधला आहे. देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब यांचा क्रमांक लागणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
भाजपकडून सातत्याने राज्यातील अन्य मंत्री सुद्धा ईडीच्या चौकशीत अडकतील असा आरोप होतो. केवळ महाविकास आघाडीतील नेतेच ईडीच्या चौकशीत अडकत आहेत. याबाबत अनिल परब यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी, आरोप करायचे त्यांनी करू द्या, मी त्यांना उत्तर देणार नाही, मला ज्यांना उत्तर देयचे गरजेचे आहे त्यांना देईल असे म्हटले. तसेच माझ्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, होणारही नाही असे म्हणत भाजपकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांवर रोखठोक भूमिका मांडली.