मी तक्रार मंत्री झालोय; माझ्याच खात्याचे आदेश मला बातमीतून कळतात : बच्चू कडू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 12:43 PM2021-02-05T12:43:02+5:302021-02-05T12:46:29+5:30
मी राज्यमंत्री असताना मंत्र्यांच्या बैठकीत मीच तक्रारी करतो. त्यामुळे मी तक्रार मंत्री झालो आहे.
औरंगाबाद : विधान परिषदेत शिक्षण नव्हे केवळ शिक्षकांचीच चर्चा होते. याला आम्ही राजकारणीच जबाबदार आहोत. मी राज्यमंत्री असताना मंत्र्यांच्या बैठकीत मीच तक्रारी करतो. त्यामुळे मी तक्रार मंत्री झालो आहे. राज्यमंत्र्याला काही अधिकार नाही. त्यामुळे माझ्याच विभागाचे आदेश मला दुसऱ्या दिवशी बातमीतून कळतात, असा नाराजीचा सूर शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश (बच्चू) कडू यांनी व्यक्त केला.
तापडिया नाट्यमंदिरात गुरुवारी उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येऊन सुरू केलेला जिल्हा परिषद लाइव्ह एज्युकेशन ॲप लाँच सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ‘ई-कट्टा’ने हे ॲप बनवले असून, त्याचे लाँचिंग शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल, जालेंद्र बटुळे, अश्विनी लाटकर, जयश्री चव्हाण, रमेश ठाकूर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कडू पुढे बोलताना म्हणाले, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिकवण्याचे भाग्य मिळाल्यावर नाकर्तेपणा करणाऱ्या अफजल खानापेक्षा कमी नाही. शैक्षणिक विषमतेची दरी मिटवायची आहे. पूर्वी गावात शिक्षकाशिवाय कोणतेही काम होत नव्हते. त्यांच्याबद्दल प्रचंड धाक, आदरयुक्त भीती होती. तो काळ परत आणण्यासाठी शिक्षकांनी मनावर घेतले पाहिजे. त्यासाठी आता काम केले पाहिजे. आज आरोग्य शिक्षणासह सर्वच विभागांची अवस्था वाईट आहे. ती परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. समजदारीने शिकण्याची आज गरज आहे. काही शाळा सोडल्या, तर खाजगी शाळांकडून जास्तीची वसुली होतेय, त्याला लगाम लावण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
डंगऱ्या बैलांवर झूल टाकण्याचा प्रकार नको
पैसा आल्यावर शिक्षणही बदलते. आता पैसेवाल्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळांचे शिक्षण नकोय. सरपंच, अधिकारी, शिक्षकांची मुलेच जिल्हा परिषदेच्या शाळेत जात नाहीत. आर्थिक दरी एकवेळ परवडेल. मात्र, ही शिक्षणाची विषमता परवडणारी नाही. हे बदलण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोना काळात गावातील २५ टक्के मुलेही ऑनलाइन आले नाहीत. त्याचा जाब कोण देईल. उगाच डंगऱ्या बैलांवर झूल टाकण्याचा प्रकार नको, असेही राज्यमंत्री कडू म्हणाले.
शिक्षकांचा सत्कार
कोरोना काळात शिक्षक गजेंद्र बोंबले, नितीन अंतरकर यांनी संकल्पना सत्यात उतरवत ४०० शिक्षक राज्यभरातून जोडले. यू-ट्यूब ते ॲपपर्यंत मोफत ऑनलाइन शिक्षणाचे दालन यांनी सुरू केले. लाइव्ह पाठ, गंमत शाळा, रोबोटिक्स, जर्मन, जपानी भाषा पहिली ते दहावीपर्यंत सर्व साहित्य ऑडिओ बुक, ई-बुक आणि व्हिडिओ ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमासाठी झटणाऱ्या शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.