औरंगाबाद : कंपनीत कामगार असलेल्या युवकाने शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अनेकवेळा फोन करुन 'मी आज पोलीस स्टेशन उडवणार' अशा पद्धतीची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. या प्रकरणी युवकास गुन्हे शाखेच्या पथकाने युवकास पकडून आणत, बेगमपुरा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
शुभव वैभव काळे (२३, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आयुक्तालयात असलेल्या नियंत्रण कक्षाच्या ११२ नंबरवर शुभम काळे याने सोमवारी दुपारी १२ ते २ या वेळेत तब्बल चार वेळा फोन करुन शहरातील कोणतेही पोलीस ठाणे आज काही वेळात उडविण्यात येणार आहे, अशी धमकी दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रण सतर्क झाली. शुभम काळे याचे मोबाईल लोकेशन शोधण्यासाठी सायबर व गुन्हे शाखेचे तीन पथके तैनात करण्यात आली. खोटी माहिती देणाऱ्याचा शोधासाठी तीन पथके पाठविण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईलच्या लोकेशनद्वारे शुभम याला एमआयडीसी चिकलठाणा परिसरातुन शोधुन काढले. त्यास गुन्हे शाखेच्या पथकाने बेगमपुरा ठाण्यात हजर केले. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत टाईमपास म्हणून नियंत्रण कक्षाला फोन केला असल्याची माहिती दिली. या तरुणाच्या विरोधात नियंत्रण कक्षाचे अंमलदार अरविंद मेने यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीला पकडण्यााची कार्यवाही गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, सहायक उपनिरीक्षक सतीश जाधव, हवालदार जितेंद्र ठाकुर, संजय राजपुत, विठ्ठल सुरे यांनी केली.
अफवा पसरविल्यास कारवाईशहरात पोलिसांना खोटी माहिती देणारे व अफवा पसरविणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.