Maratha Reservation: "....तर मी आत्महत्या केली नसती"; औरंगाबादेत मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:47 PM2018-09-11T13:47:01+5:302018-09-11T13:54:25+5:30
खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगांव येथील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्यासत्र अद्याप सुरूच आहे. आज सकाळी खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगांव येथील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. किशोर शिवाजी हारदे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. यानंतर गल्लेबोरगाव बाजार पेठ बंद करण्यात आली असून खुलताबाद पोलीस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर जमले आहेत.
किशोर याचे शिक्षण बी एस.स्सी..आय.टी.आय. असे होते व तो येवला जिल्हा नाशिक येथे एका फायनंस कंपनीत काम करत असे. काही दिवसांपूर्वी तो पोळा सणासाठी गावाकडे आला होता. आरक्षण नसल्यामुळे आपल्याला सरकारी नोकरी मिळत नाही असे तो मित्रांना व नातेवाईक सांगत असे. यामुळे तो निराश असे. यातूनच त्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ-भावजई असा परिवार आहे. या घटनेनंतर गावातील संपूर्ण बाजार पेठ बंद करण्यात आली आहे.
..तर मी आत्महत्या केली नसती
मृत किशोर याच्या खिशात एक चिट्ठी सापडली असून त्यात, '' ही आत्महत्या नसुन खून आहे, आणि तो सरकारने केला आहे. मराठा आरक्षण लवकर दिले असते तर , मी आत्महत्या केली नसती. आपलाच किशोर हारदे'' अस मजकूर लिहिलेला आहे.