औरंगाबाद येथील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:16 AM2018-06-15T00:16:06+5:302018-06-15T00:17:52+5:30
कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
पाणी आणि विजेच्या समस्येवर उपाययोजना करण्यासंदर्भात उद्योजक संघटनांकडून बैठक घेण्याची मागणी केली जात असताना त्याची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) महिनाभरापासून दखलच घेतलेली नाही. या प्रकारामुळेही उद्योगविश्वात संतापाचे वातावरण आहे.
औद्योगिक वसाहतींना देण्यात येणारे पाणी शहरालगतच्या ४० हून अधिक गावांना दिले जात आहे. ‘एमआयडीसी’च्या वाळूज येथील ५ आणि शेंद्रा येथील ३ ठिकाणच्या वितरण व्यवस्थेवरून हे पाणी दिले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ‘एमआयडीसी’तर्फे गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. परंतु हे करताना औद्योगिक वसाहतींना पाण्याचा तुटवडा होणार नाही, या बाबीकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे थोडाही वारा सुटत नाही, तोच वीजपुरवठा बंद होतो. हा प्रकार चिकलठाण्यात सर्वाधिक होत आहे. विजेअभावी वेळेवर उत्पादन देऊ शकत नसल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा यासह जालना येथील औद्योगिक वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. प्रसाधनगृहांमध्येदेखील पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे कामगारांची कुचंबणा होत आहे. उद्योजक संघटना २१ मेपासून ‘एमआयडीसी’सोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन एमआयडीसीत नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात असून, वाळूज, शेंद्रा आणि जालना येथील उद्योगांचे पाणी काही प्रमाणात गावांना दिले जात आहे, असे ‘एमआयडीसी’च्या अभियंत्यांनी सांगितले.
दोन महिन्यांत प्रश्न निकाली
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या कालावधीत थोडासा त्रास होतो. सध्या वाळूजमध्ये काहीच अडचण नाही. चिकलठाण्यात इंडस्ट्रीयल-२ व रेडियंट अॅग्रो या दोन फीडरमध्ये दोष आहे. त्याची दुरुस्ती केली आहे. येथे भूमिगत केबलचे काम करण्यात येत आहे. दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण होऊन हा प्रश्न निकाली निघेल.
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरण
उद्योजकांच्या तक्रारी
वाळूज, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा पुरवठा आणि विजेच्या गुणवत्तेचा प्रश्न भेडसावत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याने उपकरणे खराब होतात. ‘एमआयडीसी’कडे तक्रारी करूनही उद्योगांसाठी पुरेसे पाणीही मिळत नाही. यासंदर्भात उद्योजकांकडून तक्रारी येत आहेत. महावितरणने ‘सीएमआयए’बरोबर चर्चा करून तोडगा काढला पाहिजे.
-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआयए