जिंतूर तालुक्यात १९० ठिकाणी अवैध दारू विक्री
By Admin | Published: June 21, 2017 11:35 PM2017-06-21T23:35:21+5:302017-06-21T23:43:03+5:30
जिंतूर : शासनाने दारूबंदी केल्यानंतर जिंतूर शहरात ४० तर ग्रामीण भागात १५० ठिकाणी अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू झाली असून, यामधून दररोज आठ ते दहा लाखांची उलाढाल होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : शासनाने दारूबंदी केल्यानंतर जिंतूर शहरात ४० तर ग्रामीण भागात १५० ठिकाणी अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू झाली असून, यामधून दररोज आठ ते दहा लाखांची उलाढाल होत आहे.
जिंतूर शहरात असलेले एक वॉईनशॉप व चार बार शासनाच्या निर्णयाने बंद झाले. यामुळे सामान्य माणूस, महिला वर्ग आनंदित झाला खरा; परंतु, हा आनंद क्षणिक ठरला. शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलवर, या परिसरातील दोन टपऱ्या, जि. प. मैदान, शिवाजी चौकातील कॉम्प्लेक्स, एका लॉजवर, येलदरी रस्त्यावर तीन ठिकाणी, मोंढा परिसरात दोन, संत सावता मंदिर परिसर, गणपती चौक भागात २ ठिकाणी बेरोजगार युवक खुलेआम अवैध दारू विक्री करीत आहेत. हुतात्मा स्मारक परिसरात तीन ठिकाणी, सरकारी दवाखान्यासमोर, तहसील कार्यालय परिसर आदी ठिकाणी सहजतेने दारू विक्री होत आहे. विशेष म्हणजे, मंठा, सेलू, परभणी येथून मोठ्या प्रमाणावर दारू आणली जाते. एका बॉटलमागे ७० रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यत नफा कमावला जातो. जिंतूर शहरामध्ये दोन ते तीन ठिकाणी बनावट दारू बनविली जाते. काही दिवसांपूर्वी याची चित्रफित व्हायरल झाली होती. शिवाजी चौकातील एका कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार चालतो. बनावट दारू बनविणाऱ्या काही जणांनी ही दारू ग्रामीण भागातही पोहोचविण्यासाठी माणसे नेमली आहेत. शहरातील परिस्थितीप्रमाणेच ग्रामीण भागात सर्रास दारू विक्री सुरू आहे. गावागावांत पानटपरी व दुकानांवर खुलेआम दारू उपलब्ध होेते. विशेष म्हणजे पोलिसांची त्यांना कसलीही भीती नसल्याचे दिसून येत आहे.