औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील अंदाजे ४० उपअभियंत्यांना बेकायदेशीररीत्या कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
बांधकाम विभागात सेवेत आल्यानंतर पदोन्नतीसाठी उपअभियंत्यांना तीन वर्षांच्या आत व्यावसायिक परीक्षा देऊन ती उत्तीर्ण व्हावी लागते. ती परीक्षा अभियंते उत्तीर्ण झाले नाहीतर त्यांची वेतनवाढ थांबविण्यात येते. मागील १० ते १५ वर्षांपासून जे उपअभियंते व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील अनेकांना पदोन्नती मिळालेली नाही. सध्या २००० साली जे अभियंते बांधकाम विभागाच्या सेवेत आले, त्यांना पदोन्नती देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातील अनेकांनी व्यावसायिक परीक्षा दिलेली आहे की नाही, याबाबत वरिष्ठांनी शहानिशा केलेली नाही. शहानिशा न करता मंत्रालयापर्यंत पदोन्नतीचा प्रस्ताव गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. २००० सालची बॅच संपल्यानंतर २००२ व त्यानंतर पुढील वर्षातील उपअभियंत्यांचा पदोन्नतीसाठी नंबर लागेल. यामध्ये काही सरळसेवा भरतीच्या तर काही नागरी सेवेतून बांधकाम विभागात आलेल्या अभियंत्यांना संधी मिळेल.
पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता भगत यांच्यामार्फत पदोन्नती देण्यात येणाऱ्या अभियंत्यांची यादी अधीक्षक आणि मुख्य अभियंत्यांकडे देण्यात आली आहे. पदोन्नती देण्यात येणारे सर्व अभियंते परीक्षा उत्तीर्ण असल्याचा शेरा भगत यांनी मारला आहे. परंतु काही जणांनी खोलात जाऊन या प्रकरणात माहिती घेतली असता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण नसल्याची माहिती पुढे आली आहे. असे असतानाही परीक्षा उत्तीर्ण असल्याचा लेखी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांनीदेखील यात फारसे लक्ष घातले नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. या प्रस्तावांची पुन्हा छाननी व्हावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
अधीक्षक अभियंत्यांचे मत असेअधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण न होताच काही जणांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव पुढे पाठविण्यात आल्याची माहिती कानावर आली आहे. या प्रकरणात पूर्ण माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल.