छत्रपती संभाजीनगर : नामांतर ठराव दिनाच्या स्मरणार्थ २७ जुलै रोजी गुरुवारी विद्यापीठ गेटसमोरील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शहिदांना अभिवादन केले.
यावेळी साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी नामांतर लढ्याच्या संघर्षमय आठवणींनी उजाळा दिला. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार यांनी येणाऱ्या १४ जानेवारी रोजी नामविस्तारदिनी या लढ्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना आंबेडकरी चळवळीच्यावतीने कृतज्ञतापूर्वक आर्थिक मदत करण्याचा निर्धार बोलून दाखविला.
उपस्थित विविध कार्यकर्त्यांनी शहिदांप्रती भावना व्यक्त करताना सांगितले की, आंबेडकरोत्तर चळवळीतील विद्यापीठ नामांतर लढा हा सर्वात मोठा प्रदीर्घ ठरला आहे. नामांतराचा लढा अस्मिता आणि अस्तित्वासाठी लढला गेला. ज्याची तुलनाच होऊ शकत नाही. लाखो, करोडो लोकांनी हजारो मोर्चे काढून सतत १७ वर्षे हा लढा दिला. यात तब्बल २२ भीमसैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले. या लढ्यातील शहिदांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे सर्वंकश पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. परंतु गेल्या ३० वर्षांत ज्यांनी नामांतर चळवळीच्या नावाखाली आमदारकी, खासदारकी, सभापती, नगरसेवक शाळा, कॉलेजेस काढून सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा भोगली, अशाच लोकांचे सत्कार सोहळे होत आहेत, ही निंदनीय बाब आहे.
याप्रसंगी गौतम खरात, किशोर थोरात, गौतम लांडगे, रामभाऊ पेरकर, अरुण बोर्डे, राजू साबळे, विजय वाहुळ, सुरेश शिनगारे, राहुल साळवे, संदीप आढाव, गुड्डू निकाळजे, आनंद कस्तुरे, भीमसेन कांबळे, लक्ष्मण हिवराळे, कुणाल वराळे, अरुण शिरसाठ, संतोष भिंगारे आदी भीमसैनिक उपस्थित होते.