आरटीईत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाचे; बालकांचे साडेचार वर्षे वय असेल तरच मिळेल मोफत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 06:10 PM2022-03-04T18:10:06+5:302022-03-04T18:10:57+5:30
वयोमर्यादा निश्चितीमुळे संभ्रम दूर - जुलै ते नोव्हेंबरदरम्यान जन्मलेल्याचे नुकसान टळणार
- योगेश पायघन
औरंगाबाद : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत ( Right to Educati0n ) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली अशा विविध स्तरावरील प्रवेशाबाबत संभ्रमावस्था होती. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्यात आले आहे. जुलै ते नोव्हेंबरदरम्यान जन्मलेल्या बालकांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून वयोमर्यादेची निश्चिती करण्यात आली.
अशी असेल वयोमर्यादा
प्रवेशाचा वर्ग - ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे किमान वय
प्ले ग्रुप/नर्सरी- चार वर्षे ५ महिने ३० दिवस
ज्युनिअर केजी - पाच वर्षे ५ महिने ३० दिवस
सिनिअर केजी - सहा वर्षे ५ महिने ३० दिवस
पहिली - सात वर्षे ५ महिने ३० दिवस
२५ टक्के जागांवर मोफत प्रवेश
जिल्ह्यात १२७८ खाजगी शाळांपैकी ७१२ शाळा आरटीईसाठी पात्र ठरल्या. त्यापैकी ४७५ शाळा ४३०१ जागा अजून १४ हजार ५१८ पालकांनी अर्ज केले असून १२ हजार ८३० अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय पद्धतीने लाॅटरीनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल.
१० मार्चपर्यंत करा अर्ज
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पालकांना २८ फेब्रुवारी अंतिम मुदत होती. मात्र, काही जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने १० मार्चपर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या मुदतवाढीचा लाभ घेऊन आरटीईसाठी अर्ज करण्याचे आवाहन आरटीई कक्षाकडून करण्यात आले.
खासगी शाळा -५७५
मोफत प्रवेशासाठीच्या जागा -४३०१