स्पर्धा परीक्षेत १२ उत्तीर्ण दिव्यांगाने घेतला पदवीप्राप्त मदतनीस; परीक्षार्थींसह मदतनिसावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 07:12 PM2023-03-11T19:12:39+5:302023-03-11T19:13:46+5:30
म्हाडा विभागातर्फे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील पदासाठी नुकतीच लेखी परीक्षा घेण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : म्हाडा विभागातर्फे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील पदासाठी नुकतीच लेखी परीक्षा घेण्यात आली. या सरळ सेवा भरती परीक्षेत एका दिव्यांग परीक्षार्थ्याने खोटी माहिती देत मदतनीस म्हणून अधिक शिक्षण घेतलेल्या युवकास परीक्षा द्यायला लावली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर म्हाडाचे प्रशासकीय अधिकारी सूरज वैष्णव यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
परीक्षार्थी राहुल बन्सी राठोड ( रा. गव्हाळी तांडा, ता. कन्नड), मदतनीस वाल्मीक एकनाथ काकड ( रा. सिनगाव जहांगीर जि. बुलढाणा) दोघांचा आरोपीमध्ये समावेश आहे. राहुल याने स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील पदासाठी दिव्यांग प्रवर्गातून परीक्षा दिली. दोन मार्च रोजी ही लेखी परीक्षा झाली. राहुलने परीक्षेसाठी मदतनीस म्हणून वाल्मीक काकड यास घेतले होते. राहुलने हमीपत्रात वाल्मीक याची दाखवलेली शैक्षणिक पात्रता अधिक असल्याची तक्रार म्हाडाला प्राप्त झाली होती.
त्या अनुषंगाने म्हाडाकडून कागदपत्राची तपासणी झाली. त्यात तो १२ वी उत्तीर्ण असल्याचे आढळून आले तर त्याने सादर केलेल्या हमीपत्रात त्याने स्वत: बी.ए. उत्तीर्ण तर लेखनिक हा १२ वी उत्तीर्ण असल्याचे नमूद केले होते. मदतनीस वाल्मीकने म्हाडाच्या २०२१ च्या सरळसेवा भरती अंतर्गत कनिष्ठ लिपिक – टंकलेखक या पदासाठी परीक्षा दिल्याचेही समोर आले. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर आहे. टीसीएस कंपनीकडून मागविण्यात आलेल्या अहवालात ही माहिती समोर आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रतिभा आबुज करीत आहेत.