मराठवाड्यात १ लाख ९५ हजार सिंचन विहिरी अडकल्या ‘मंजुरीच्या गाळा’त
By विकास राऊत | Published: February 29, 2024 07:56 PM2024-02-29T19:56:10+5:302024-02-29T19:56:44+5:30
मराठवाड्यात सिंचन विहिरींची दीड ते दोन टक्केच कामे पूर्ण झाली आहेत.
छत्रपती संभाजीनगर : सिंचन वाढण्यासाठी रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या विहिरी बांधल्या जातात. मात्र, मराठवाड्यात सिंचन विहिरींची दीड ते दोन टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. २ लाख ६६ हजार ६६४ पैकी केवळ ४ हजार ५८० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. ६६ हजार ५७० विहिरींचे काम सुरू असून, आजवर ४७ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. १ लाख ९५ हजार ५१४ विहिरींची कामे मंजुरीच्या गाळात अडकली आहेत.
सिंचनाचे क्षेत्र वाढावे, शेतीला कायम पाणीपुरवठा राहावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी रोहयोंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विहिरींची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अनुदान मिळत असल्याने विहीर मंजुरीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज येतात. परंतु, या विहिरींचे काम पूर्ण होण्यास गती मिळत नाही. रोहयोच्या वैयक्तिक विहिरींसाठी मोठा खर्च होत आहे. त्यातूून सिंचन क्षेत्र किती वाढले, याचे कोणतेही ऑडिट होताना दिसत नाही.
दृष्टीक्षेपात विहिरींची कामे
२ लाख ६६ हजार विहीर कामांना मंजुरी.
४ हजार ५८० विहिरींचेच काम पूर्ण.
६६ हजार ५७० विहिरींचे काम सुरू आहे.
विहिरींच्या कामावर किती खर्च
अकुशल खर्च : १४ कोटी ३८ लाख ५८ हजार
कुशल खर्च : ३३ कोटी २० लाख ८० हजार
एकूण : ४७ कोटी ५९ लाख ३८ हजार
जिल्हा ........... लक्ष्य........... काम सुरू........... पूर्ण
छत्रपती संभाजीनगर... ४६६१६...... १५७७१......१२३२
जालना ......... २५८९७ ..........४९२५............. १३६
बीड................ ६३१५२ ...........१८६२२.... ३७७
धाराशिव.......... २१५८९.............. ३४५४........ २९४
हिंगोली........... २१४९९ ............६११८ ...........८७८
लातूर......... २७४०८............... ४७१४............ ७७७
नांदेड....... ३०९६४............ ५४७६................. ४१३
परभणी ......... २९५३९........... ७४९०........... ४७३
एकूण............. २६६६६४........... ६६५७०.......... ४५८०