आयुष्याच्या सायंकाळी लाखभर वृद्ध शिकले लेखन- वाचन; नवभारत साक्षरता अभियानास प्रतिसाद
By राम शिनगारे | Published: May 16, 2024 02:30 PM2024-05-16T14:30:34+5:302024-05-16T14:35:01+5:30
परीक्षेचा निकाल जाहीर, ९ हजार ४१२ वृद्धांना सुधारणा करावी लागणार
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात राबविण्यात आलेल्या उल्लास-नवभारत साक्षरता अभियानात ६६ वर्षांवरील तब्बल ९६ हजार ५१८ जण साक्षर बनले आहेत. मागील शैक्षणिक सत्रापासून सुरू केलेल्या या अभियानात निरक्षरांना शिकविल्यानंतर साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्चला घेण्यात आली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात ६६ वर्षांवरील ९६ हजार ५१७ जण उत्तीर्ण झाले आहेत तर ९ हजार ४१२ जणांना सुधारणा आवश्यक असा शेरा मिळाला आहे.
केंद्र सरकारने देशभरात उल्लास- नवभारत साक्षरता अभियान २०२२-२७ या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरुवातीला राज्यभरातील निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार संबंधितांना साक्षर करण्यासाठी अध्यापन केले. वर्षभर शिक्षण घेतल्यानंतर निरक्षरांची १७ मार्चला उत्तीर्णतेची चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला राज्यभरातून ४ लाख ५९ हजार ५३३ असाक्षरांनी नोंदणी केली होती. त्यातील ४ लाख २५ हजार ९०६ जण उत्तीर्ण झाले आहेत तर ३३ हजार ६२७ जणांना सुधारणा आवश्यक असा शेरा मिळाला. ४ लाख ४९ हजार ५३३ परीक्षार्थींमध्ये १ लाख ५ हजार ९३० परीक्षार्थींचे वय ६६ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यात ९६ हजार ५१८ निरक्षर या परीक्षेनंतर साक्षर बनल्याचे स्पष्ट झाले. विविध कारणांमुळे साक्षरतेपासून वंचित राहिलेल्या निरक्षर व्यक्तींना साक्षर बनविण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेनुसार राज्यभरात २०२७ पर्यंत १०० टक्के नागरिकांना साक्षर बनविण्याचे टार्गेट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षण संचालनालय योजना विभाग कार्य करीत आहे.
अक्षर ओळख, स्वाक्षरीची आवश्यकता
निरक्षरांना साक्षर बनविण्याच्या मोहिमेमागे निरक्षर असलेल्या व्यक्तींना किमान अक्षरांची ओळख होणे, स्वत:ची स्वाक्षरी करता यावी, ई-मेल करणे, एटीएममधून पैसे काढणे आणि भरता यावेत, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. साक्षरतेसह डिजिटल साक्षरतेला यातून प्राधान्य देण्यात आले आहे.
स्त्रियांची संख्या सर्वांधिक
राज्यात नवसाक्षरता अभियानात सर्वाधिक नोंदणी स्त्रियांनी केली होती. उल्लास ॲपवर १ लाख ८८ हजार ६२८ पुरुषांनी तर ४ लाख ५३ हजार ५९ स्त्रियांनी साक्षरतेसाठी नोंदणी केली होती. त्यानुसार परीक्षा दिलेल्यांमध्ये पुरुषांची संख्या १ लाख ३९ हजार ५८२ एवढी होती तर ३ लाख १९ हजार ९४५ स्त्रियांनी साक्षरतेची परीक्षा दिली असल्याचेही शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाने जाहीर केले आहे.
साक्षरता अभियानाची राज्यातील आकडेवारी
वयोगट...................उल्लास ॲपवर एकूण नोंदणी..................परीक्षार्थी.............उत्तीर्ण..............सुधारणा आवश्यक........उत्तीर्ण टक्केवारी
१५ ते ३५ वर्ष.....................१,१३,११०.....................................८०,६१६..............७७,६३४..................२९८२........................९६.३०
३६ ते ६५ वर्ष....................३,८६,१८२....................................२,७२,९८७...........२,५१,७५४...............२१,२३३....................९२.२२
६६ वर्षावरील...................१,४२,५२६.....................................१,०५,९३०..............९६,५१८..................९४१२.......................९१.११
एकूण................................६,४१,८१६.....................................४,५९,५३३..............४,२५,९०६.............३३,६२७....................९२.६८