संदीपान भुमरेंचे गर्दी जमवून विकास कामांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:02 AM2021-05-08T04:02:16+5:302021-05-08T04:02:16+5:30
पैठण : तालुक्यातील देवगावात रोजगार हमी योजनेच्या विविध कामांचे उद्घाटन ५ मेला रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी ...
पैठण : तालुक्यातील देवगावात रोजगार हमी योजनेच्या विविध कामांचे उद्घाटन ५ मेला रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थ जमा करून थाटामाटात केले. त्यांनी गर्दी जमवून कोरोनासंबंधी निर्बंध असलेल्या नियमांचा भंग केला असीे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कप्रमुख दत्ता गोर्डे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातून बाहेर पडू नका, असे मुख्यमंत्री वारंवार जनतेला हात जोडून विनंती करीत आहेत. तर दुसरीकडे राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला छेद देत मतदारसंघात विकासकामांचे उद्घाटन, भूमिपुजनांचा सपाटा लावला आहे. रोजगार हमी योजनेतून देवगावात पाणंद रस्ते, शेतरस्ते तसेच वैयक्तिक सिंचन विहिरीसह रोजगार हमी योजनेतून अनेक कामांचे उद्घाटन व पाहणी मंत्री भुमरे यांनी ५ मे रोजी केली. गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी भाषणादरम्यान दिले. मंत्री भुमरे यांचे पुत्र तथा जि.प. सदस्य विलास भुमरे, चितेगावचे जि.प. सदस्य अक्षय जायभाये, देवगावचे सरपंच रामलाल कोथळी, पं.स. सदस्य सोपान थोरे, देवगावचे उपसरपंच बाळासाहेब गिते, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर गिते, भगवान ढगे, पंढरीनाथ गिते, दीपक ढाकणे, अमोल गिते आदींसह ग्रामरोजगार सेवक मदन बोंदरे, शिवसेनेचे कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कोरोना काळात नियम पायदळी तुडवून विविध कामांचे उद्घाटन करणारे मंत्री भुमरे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे दत्ता गोर्डे यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणारे प्रशासन आता मंत्र्यांवर काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
------- तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव --------
पैठण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावात जवळपास दोनशेपेक्षा अधिक कोरोना रुग्ण असून, पाचोड परिसरात दहा जणांचा मृत्यू झालेला आहे. परिस्थिती बिकट असूनही मंत्री भुमरे परिसरात सर्रास विकासकामांचे उद्घाटन नियम पायदळी तुडवीत आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून, प्रशासनाला प्रभावी उपाययोजना राबविण्यात अपयश येत आहे. त्यांच्या मतदार संघातील तालुक्यात पावणेपाच हजार कोरोना रुग्ण असून आतापर्यंत ६० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-- फोटो :