कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
औरंगाबाद : घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ६६ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आयटक महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी शनिवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन कामगारांना शासन सेवेत समावून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर अभय टाकसाळ, विकास गायकवाड, किरण पंडित, महेंद्र मिसाळ, भालचंद्र चौधरी, अभिजित बनसोडे यांची नावे आहेत.
वीज खांबांपासून ३० मीटरमधील
कृषिपंपांना अधिकृत वीज जोडणी
औरंगाबाद : शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी वीज जोडण्या मिळाव्यात, म्हणून वीज खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्यांना येत्या २६ जानेवारीपूर्वी अधिकृतपणे जोडणी देण्यात येणार आहेत. राज्यात जवळपास चार लाख ८५ हजार अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्या आहेत. यापैकी किमान ३० टक्के अनधिकृत जोडण्या या वीज खांबापासून ३० मीटरच्या आत आहेत.
मोंढा रस्त्यावर वाहतूक कोंडी
औरंगाबाद : मोंढानाका उड्डाणपूल ते रविवार आठवडी बाजार मार्गावर एका बाजूने सिमेंट रस्ता करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर सध्या एकेरी मार्गावरच वाहतूक सुरू आहे. त्यातून रस्ता अपुरा पडत असल्याने ये-जा करणारी वाहने समोरासमोर येऊन वारंवार वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार याठिकाणी होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक रस्त्यावर धुळीचे लोट
औरंगाबाद : आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा होताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबर परिसरातील व्यावसायिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देऊन रस्त्याची दुरवस्था दूर करण्याची मागणी हाेत आहे.