छत्रपती संभाजीनगर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असतानाच सट्टाबाजारही तेजीत आहे. विश्वचषक म्हणजे बुकी, सट्टा खेळणाऱ्यांसाठी पर्वणीच असते. एकीकडे बेकायदेशीर असलेल्या या बाजारात दुसरीकडे सर्रास अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. एकट्या मराठवाड्यातून शनिवारच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर यंदा जवळपास १०० कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज बुकींनी व्यक्त केला आहे. भारताने आधी फलंदाजी केल्यास ३२५ धावांपर्यंतची बोली लागली असून त्याला लावलेल्या रकमेला दुप्पट म्हणजे १० हजार लावल्यास २० हजारांचा परतावा, तर केवळ टॉसवर ९७ चा भाव (लावलेल्या बोलीवर ९ हजार ७०० चा परतावा) लागला आहे.
भारत- पाकिस्तान क्रिकेटचे परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. बुकींसाठी तर हा सामना रेकॉर्डब्रेक कमाई करणारा असतो. शनिवारी अहमदाबादेत दुपारी २ वाजता सामना सुरू होईल. त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने बुकींनी तयारी केली असून विविध प्रकारचे ऑनलाइन साॅफ्टवेअर, संकेतस्थळे तयार आहेत. अहमदाबादमधील हॉटेल्स दोन महिन्यांपूर्वीच फुल्ल झाल्याने अनेकांनी अक्षरश: रुग्णालयाच्या खोल्या बुक केल्या आहेत. यामुळेच बुकींची शनिवारी दिवाळी साजरी होणार असल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी ५० पैशांनी सुरुवात,भारताला सर्वाधिक पसंतीकाही दिवसांपूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या जिंकण्याच्या अंदाजावर बुकींचा सर्वाधिक डाव होता. दोन्ही संघ मैदानावर उतरल्यावर ६० पैशांपर्यंत डाव गेला होता; तर पहिला डाव संपेपर्यंतच सट्टाबाजार दोन हजार कोटींच्या घरात गेला होता. यंदा शनिवारच्या सामन्याचा बाजार गुरुवारी दुपारीच ५० पैशांनी सुरू झाला. म्हणजेच भारतावर १० हजारांच्या डावाला ४ हजार ८००, तर पाकिस्तानवर ५ हजार मिळतील. यात हरणाऱ्या संघाच्या बोलीवर अधिक परतावा देतात. म्हणजेच यंदा बुकींच्या बाजारात भारताला सर्वाधिक पसंती आहे.
एकूण सामन्यात १४ षटकार व ५० चौकारांचा बुकीचा अंदाजसंपूर्ण सामन्यात १६ विकेट पडतील का, यासाठी ७५ चा भाव लागला आहे. म्हणजे, ७ हजार ५०० रुपयांचा परतावा केवळ या बोलीवर आहे. तर ४ जणांचा त्रिफळा उडेल का, पाऊस पडल्यास पुढचा अंदाज कसा असेल, कोणता खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी कुठे उभे राहील, झेल घेऊन, रनआऊट द्वारे किती खेळाडू बाद होतील, कोण किती षटकार, चाैकार मारेल यावर लाखोंचा डाव लागला आहे.
बुकीचे आवडीचे खेळाडूयंदा भारताकडून बुकीनी फ्रंटला राेहित शर्मा, विराट कोहली व के. एल. राहुलला प्राधान्य दिले आहे. तर पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवान, बाबर आझम यांच्यावर सर्वाधिक डाव लावला आहे.
असा रंगलाय सट्ट्याचा भावफलक१० ओव्हरच्या धावात (लावलेल्या रकमेला दुप्पट परतावा) हो नाही
भारत - ५७ ५५पाकिस्तान- ४९ ४७
सट्टा जोड५० ओव्हर (पहिली फलंदाजी केल्यास)
भारत - ३२५पाकिस्तान - २९०
९० च्या भावावर विकेटचा रेटभारत - ३५ धावावर पहिली, दुसरी ८५पाकिस्तान - पहिली २८ धावावर तर ७५ वर दुसरी.