औरंगाबाद : औरंगाबादहून अखेर १६ डिसेंबरपासून इंडिगोकडून अखेर बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू केली जाणार आहे. आठवड्यातून ४ दिवस हे विमाम उड्डाण घेईल.
आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख आहे. शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरू येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते; परंतु कोरोनामुळे विमानसेवा ठप्प झाली होती. कोरोनाच्या विळखा कमी झाल्यानंतर औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. गेली काही दिवस बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराला हैदराबादपाठोपाठ दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षा होती. अखेर ही कनेक्टिव्हिटी लवकरच मिळणार आहे. उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, अनेक दिवसांपासून या विमानसेवेसाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर १६ डिसेंबरपासून इंडिगो ही सेवा सुरू करीत आहे. कोरोना विळख्यानंतर औरंगाबादेतील विमानसेवा पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू झाल्यानंतर विमानसेवा वाढीस आणखी मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू होण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे.
आठवड्यातून ४ दिवस सेवा
आठवड्यातून रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी हे विमान उड्डाण घेईल. बंगळुरूहून हे विमान सकाळी ७.४० वाजता उड्डाण घेईल आणि औरंगाबादेत सकाळी ९.१५ वाजता दाखल होईल. त्यानंतर औरंगाबादहून सकाळी ९.४५ वाजता उड्डाण घेईल आणि सकाळी ११.२० वाजता हे विमान बंगळुरू येथे पोहोचेल.