वाळूज महानगर : वाळूजच्या मसिआ सभागृहात शुक्रवारी आयोजित बैठकीत उद्योनगरीतील अस्वच्छतेसंदर्भात उद्योजकांनी कचरा व्यवस्थापन करणाऱ्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उद्योगनगरी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महिंद्रा कंपनीच्यावतीने विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले.
वाळूज औद्योगिक क्षेत्र व बजाजनगर येथील कचरा व्यवस्थापनाचे काम बीओटी तत्वावर इंदोरच्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीकडून नियमितपणे औद्योगिक क्षेत्रातील केरकचरा उचलला जात नसल्यामुळे त्रस्त उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर एमआयडीसीचे मुख्य अभियंता शिवहरी दराडे व कार्यकारी अभियंता भुषण हर्षे यांनी उद्योजक व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करुन तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर बुधवारी (दि.७) मसिआच्या सभागृहात उद्योजक, एमआयडीसी व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मसिआचे उपाध्यक्ष नारायण पवार, सचिव राहुल मोगले, एमआयडीसीचे सहा.अभियंता गणेश मुळीकर, सुधीर सुत्रावे, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे एस.सुंदरबाबु आदींची प्रमूख उपस्थिती होती.
उद्योगनगरी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीकडून लवकरच सर्व सेक्टरमध्ये कचरा उचलण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे कंपनीने एस. सुंदरबाबु यांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रात धोकादायक नसलेला कचरा दिवसाआड घंटागाडीद्वारे गोळा केला जाणार असून घंटागाडीच्या संख्येत वाढ करणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.