कन्व्हेंशन सेंटरसाठी उद्योग सचिवांना उद्योजकांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:09 PM2019-04-12T23:09:04+5:302019-04-12T23:09:34+5:30
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या कन्व्हेंशन सेंटरच्या उभारणीबाबत निर्णय घ्या, अशी मागणी शहरातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय औद्योगिक धोरण विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांच्याकडे शुक्रवारी केली.
औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या कन्व्हेंशन सेंटरच्या उभारणीबाबत निर्णय घ्या, अशी मागणी शहरातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय औद्योगिक धोरण विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांच्याकडे शुक्रवारी केली.
दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल-कॉरिडॉरच्या शेंद्रा आणि बिडकीन पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधांच्या व प्रशासकीय इमारत उभारणीची पाहणी करून त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर दुपारी शहरातील औद्योगिक संघटना सदस्य, उद्योजकांशी संवाद साधला. यामध्ये केंद्र आणि राज्यातील औद्योगिक धोरण व इतर मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत कन्व्हेंशन सेंटर प्रस्तावित आहे. त्याच्या उभारणीबाबतचा विषय उद्योजकांनी सदरील बैठकीत काढला. पन्नास एकर म्हणजेच अंदाजे दोन लाख चौरस मीटर जागेत ते कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा विचार असल्याची माहिती यावेळी उद्योजकांना देण्यात आली. यामध्ये प्रदर्शन हॉल व अन्य सुविधा सदरील सेंटरच्या जागेबाहेर असाव्यात, अशी सूचना यावेळी उद्योजकांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला एआयटीएलचे सहसरव्यवस्थापक गजानन पाटील, सीआयआयचे ऋषी कुमार बागला, मुकुंद कुलकर्णी, प्रसाद कोकीळ, राहुल मोगले, सुरेश तोडकर आदींची उपस्थिती होती.