पैठण : धरणात येणारी आवक अचानक वाढल्याने जायकवाडीचे १८ दरवाजे एक फूटाने वर उचलून आज गोदावरीत होणारा विसर्ग ९४३२ क्युसेक्सने वाढविण्यात आला. बुधवारी सायंकाळी धरणातून २१९५३ क्युसेक्स क्षमतेने एकूण विसर्ग सुरू होता. मोठ्या क्षमतेने गोदावरीत विसर्ग झाल्याने गोदावरीला पूर आला असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी धरणाचा जलसाठा ९८.९५% च्या पुढे सरकला होता तर धरणात येणारी आवक वाढत चालली होती. यामुळे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी विसर्ग वाढविण्याच्या सूचना दिल्या यानुसार सकाळी आठ वाजता अर्धाफूटाने सुरू असलेले ८ दरवाजे एक फूटाने करून ४१९२ क्युसेक्सने विसर्गात वाढ करण्यात आली. विसर्गात वाढ करूनही धरणाच्या पाणीपातळीत घट होत नसल्याने सायंकाळी ७ ते ८ च्या दरम्यान पुन्हा १० दरवाजे एक फूटाने वर उचलण्याचा निर्णय घेऊन विसर्ग ५२४० क्युसेक्नने वाढविण्यात आला. सकाळी धरणाचा जलसाठा ९८.९५% होता दिवसभरात दोनदा विसर्ग वाढविल्या नंतरही संध्याकाळी जलसाठा ९८.७९ % इतका कायम आहे.
जायकवाडी साठी नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून ३२२८ व अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून ४००० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सुरू असून जायकवाडी धरणात हे पाणी दाखल होत आहे. बुधवारी धरणाच्या सांडव्यातून १८८६४ क्युसेक्स व जलविद्युत प्रकल्पातून १५८९ क्युसेक्स असा मिळून गोदावरी पात्रात २०४५३ क्युसेक्स विसर्ग सुरू असून डाव्या कालव्यातून ९०० व उजव्या कालव्यातून ६०० क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे.
संभाव्य पुरपरिस्थिती टाळण्यासाठी धरणात जल पॉकेट ठेवा.......जायकवाडी धरणाचा जलसाठा ९९% झाला असून मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसाने गेल्या आठवडा भरात धरणातून होणाऱ्या विसर्गात जायकवाडी प्रशासनास पटापट बदल करावे लागले आहेत. अशातच मुक्त पाणलोट क्षेत्रात ढगफुटी वा मोठा पाऊस झाल्यास धरणातून मोठा विसर्ग करण्या शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसणार आहे. तशी वेळ आल्यास पैठण ते नांदेड या दरम्यान पुरपरिस्थिती ओढावते असा पूर्वानुभव आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी धरणात किमान ३% चे पॉकेट निर्माण करून ठेवावे अशी मागणी जेष्ठ समाजसेवक दिनेश पारीख यांनी केली आहे.