औरंगाबाद : विविध शहरातील रस्त्यावरील दुकाने फोडणा-या आंतरराज्यीय टोळीला नाशिक येथे पकडण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या टोळीने गंगापूर येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकान आणि वैजापूरमधील बीअर शॉपी फोडल्याची कबुली दिली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.
मुस्तफा अब्दुल अन्सारी (२०, रा.खेरा, टुंडा, जि. गिर्डी, झारखंड), सर्फराज हरुण अन्सारी(२४,रा. जामतेरा,जि.रांची, झारखंड), वहिद्दोदीन ऊर्फ सर्फराज शमशोद्दीन खान (२३,रा. देवळाई गाव, नाशिक), विकास पाराजी गवते(२५,रा. धनगर गल्ली, देवळाई,नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की, गंगापूर येथील स्वप्नील प्रकाशलाल कटारिया (रा.शिवाजीनगर) यांचे जानराव कॉम्प्लेक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शोरूम आहे. हे शोरूम २९ डिसेंबर रोजी फोडून चोरट्यांनी ५ एलईडी टी.व्ही., दोन डीव्हीडी असा सुमारे ९८ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना आंतरराज्यीय टोळीने हा गुन्हा केल्याची माहिती खब-याने गुन्हे शाखेला दिली. यानंतर पोलीस निरीक्षक भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, कर्मचारी रतन वारे, विठ्ठल राख, आशिष जमधडे, रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे, वसंत लटपटे यांनी तपास करून नाशिक येथील देवळाई भागातून चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत वैजापूर आणि गंगापूर येथील दुकाने फोडल्याची कबुली दिली.
गंगापूर येथील दुुकानातून चोरलेला मुद्देमाल त्यांनी पिकअप गाडीमधून लंपास केला. ही पिकअप गाडी आणि मोबाईल असा सुमारे २ लाख २९ हजारांचा ऐवज पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला. या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. शिवाय त्यांनी वैजापूर येथील बीअर शॉपी फोडून तेथून मद्यसाठा लंपास केल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय विविध जिल्ह्यांत आणि शहरात त्यांनी अशा प्रकारच्या चो-या केल्याची कबुली दिली.