प्रेमात अडथळा आणला, अल्पवयीन मुलीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने केला महिलेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 01:09 PM2022-05-10T13:09:25+5:302022-05-10T13:10:38+5:30

पोलिसांनी १२ तासाच्या आत गुन्हा उघड केला असून मारेकरी बॉयफ्रेंड, त्याचा मित्र आणि दोन विधिसंघर्षग्रस्त मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Interrupted love, minor girl murders woman with the help of boyfriend | प्रेमात अडथळा आणला, अल्पवयीन मुलीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने केला महिलेचा खून

प्रेमात अडथळा आणला, अल्पवयीन मुलीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने केला महिलेचा खून

googlenewsNext

औरंगाबाद : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या महिलेचा एका अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंड, अल्पवयीन मैत्रीण आणि मित्राच्या मदतीने बाळापूर शिवारातील शेतात बोलावून घेऊन गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांनी १२ तासाच्या आत या खुनाचा उलगडा करीत मारेकरी बॉयफ्रेंड व त्याच्या मित्रास अटक केली. तसेच दोन विधिसंघर्षग्रस्त मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घटनेमुळे मुकुंदवाडी परिसर हादरून गेला आहे.

सुशिला संजय पवार (वय ३९, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. मुख्य आरोपी दीपक राजू भताडे (२४, रा. शिवाजीनगर, गल्ली नं. २, गारखेडा), त्याचा मित्र सुनील ऊर्फ राहुल संजय महेर (१९, रा. हीनानगर, चिकलठाणा), तसेच १७ वर्षांच्या आणि १२ वर्षांच्या विधिसंघर्षग्रस्त मुलींचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. मृत सुशिला यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले असून त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात सुशिला या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असत. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सुशिला यांना १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने फोन करून बाळापूर शिवारात बोलावून घेतले. त्या ठिकाणी सुशिला दुचाकीवरून गेल्यानंतर दीपक याने १७ वर्षांच्या मुलीसोबतच्या प्रेमात तुम्ही अडथळा निर्माण करू नका, असे सांगितले. त्यावरून वाद सुरू झाला. तेव्हा १२ वर्षांच्या मुलीने सुशिला यांचे केस पकडले. सुनीलने त्यांचा एक हात पकडला, १७ वर्षांच्या मुलीने दुसरा हात पकडला. मुख्य आरोपी दीपकने सुशिला यांच्या मानेवर चाकूने आठ वार केले. यातच त्यांचा जीव गेला. सुशिला या मृत झाल्यानंतर त्यांची दुचाकी घेऊन चौघे निघून गेले.

ही घटना सकाळी आठ वाजता उघडकीस आली. तेव्हा चिकलठाणा पोलिसांची हद्द असल्यामुळे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, निरीक्षक देविदास गात यांच्यासह इतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

नवीन चाकू, सीमकार्डची खरेदी
सुशिला यांचा खून करण्याची योजना चौकडीने काही दिवसांपूर्वीच बनवली होती. त्यासाठी एका नव्या धारदार चाकूची खरेदीही केली होती. तसेच फोन करून शेतात बोलावण्यासाठी दुसऱ्याच एका व्यक्तीच्या नावावर सीमकार्ड खरेदी केले होते. त्या नंबरवरून फोन करून बाळापूर शिवारात सुशिला यांना बोलावून घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

मोठ्या मुलाचा २७ रोजी विवाह
मृताच्या मुलाचा विवाह २७ मे रोजी होणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू होती. रविवारी मुलगा कामानिमित्त बाहेरगावी गेला असताना त्यास आईने फोन करून सोन्याची व्यवस्था झाली असून, सर्व सोने सोडवून आणले असल्याचे सांगितले होते.

प्रेमप्रकरणातून कृत्य
गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक भताडे याचे १७ वर्षांच्या मुलीसोबत काही वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. यात दीपकच्या मदतीला त्याचा मित्र सुनील आला. १७ वर्षांच्या मुलीच्या मदतीला तिची १२ वर्षांची मैत्रीण आल्याचे चौकशीत समोर आले.

गुंतागुंतीच्या प्रकरणाचा १२ तासांत तपास
अतिशय गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी १२ तासांत उलगडा केला. पोलीस अधीक्षक कलवानिया यांनी आदेश दिल्यानंतर संशयितांना ताब्यात घेतले होते. अप्पर अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर हे दिवसभर चिकलठाणा पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. निरीक्षक देविदास गात, एलसीबीचे उपनिरीक्षक विजय जाधव, चिकलठाण्याचे उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर, योगेश खटाणे यांच्या पथकांनी सर्व बाजूंनी तपास करीत खुनाचा उलगडा केला.

Web Title: Interrupted love, minor girl murders woman with the help of boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.