छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात ओपीडीसाठी रांग, जिल्हा रुग्णालयात रांग, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर रांग, शासकीय कार्यालयांतही रांग. जिथे पाहावे तिथे फक्त नागरिकांना रांगेतच उभे राहावे लागते. रांगेत उभे राहिल्याशिवाय काहीच मिळत नाही का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, अनेक सुविधा रांगेत उभे न राहता ऑनलाइन पद्धतीनेही मिळविता येतात; परंतु तरीही अनेकजण रांगेतच उभे राहतात.
आजारापेक्षा ओपीडीच्या रांगेचे टेन्शनघाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. नोंदणीसाठी किमान १५ ते २० मिनिटे थांबावेच लागते. नोंदणी झाल्यानंतरच उपचारासाठी संबंधित विभागाच्या ओपीडीत जावे लागते.
जिल्हा रुग्णालयजिल्हा रुग्णालयात ‘ओपीडी’सह प्रत्येक ठिकाणी रांगेत उभे राहावे लागते. आधी ओपीडी पेपरसाठी रांग, त्यानंतर डाॅक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी रांग, एक्स-रे काढण्यासाठी रांग, रक्त तपासणीसाठीही रांग असते. प्रत्येक ठिकाणी किमान १० ते १५ मिनिटे रांगेत उभे राहावेच लागते.
रेल्वेस्टेशनरेल्वेस्टेशनवर आरक्षित आणि जनरल तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. त्यासाठी प्रत्येकाला किमान १० ते २० मिनिटे तरी रांगेत उभे राहावे लागते. अगदी रेल्वे येण्याच्या काही मिनिटे आधीपर्यंत प्रवासी रांगेत असतात.
मनुष्यबळ अपुरेघाटीत मनुष्यबळ अपुरे आहे. आहे त्या मनुष्यबळात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रिक्त जागा भरल्यानंतर सुविधा आणखी वाढतील.- डाॅ. विजय कल्याणकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी
‘आभा’, ई-संजीवनीआभा नंबर रजिस्टर असल्यास रुग्णाला टोकन नंबर मिळतो. त्याशिवाय ई-संजीवनी ओपीडीद्वारे उपचार घेता येतो.- डाॅ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
‘यूटीएस’ ॲपवरून करावी बुकिंगऑनलाइन पद्धतीने रेल्वेचे आरक्षित तिकीट काढता येते. ‘यूटीएस’ ॲपद्वारे अनारक्षित तिकीटही बुक करता येते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.