औरंगाबाद : वर्षभर अभ्यासावर घेतलेली मेहनत सफल होण्यासाठी विद्यार्थी एकाग्र होऊन पेपर सोडवीत होते; पण बाहेरून जाणाऱ्या लग्नाच्या मिरवणुकीने सगळ्या एकाग्रतेचा भंग करून टाकला आणि त्या कर्णकर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अक्षरश: अवघड होऊन बसले. रविवारी (दि.१७) लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात आली. यावेळी अनेक केंद्रांवरील परीक्षार्थींना डीजेच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
परीक्षेचा हंगाम आणि लग्नसराई एकाच काळात सुरू होते. लग्नसराईमध्ये काढण्यात येणाऱ्या वरातीचा आणि डीजेच्या गोंगाटाचा सगळ्यात जास्त त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागतोय. परीक्षेच्या तयारीसाठी आधीच विद्यार्थ्यांनी सगळ्या हौस-मौजा बाजूला सारून आणि लग्न समारंभाला जाणे टाळून अभ्यासात मन गुंतवलेले असते; पण अशा घटनांमुळे आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांचे मन नकळत पुन्हा या गोष्टीत गुंतले जाते आणि परिणामी एकाग्रता भंग पावते.
रविवारी लोकसेवा आयोगातर्फे शहरात विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. एका केंद्रावर जवळपास ४०० ते ५०० विद्यार्थी होते. यापैकी नागसेन भवन, मिलिंद कॉलेज, पीईएस महाविद्यालय या केंद्रांवरही अनेक विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते. यादरम्यान दुपारच्या सत्रात झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सदर अनुभव आला. जवळपास अर्धा ते पाऊणतास ही लग्नाची वरात या रस्त्याने चालली होती. त्यातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांना अक्षरश: धडकी भरली. मन एकाग्र करून प्रश्न सोडविणे अवघड झाले होते; पण मर्यादित वेळेमुळे आवाज थांबण्याची वाट पाहत बसणेही अशक्य असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जमेल तसा पेपर सोडविला आणि झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.
अपयश आले, तर जबाबदार कोण?ऐन परीक्षा देत असताना सुरू झालेला हा डीजेचा गोंगाट आमच्या सगळ्यांसाठीच अत्यंत त्रासदायक होता. या गोष्टीचा परिणाम निश्चितच आमच्या पेपर सोडविण्यावर झाला असून, जर परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, तर याला जबाबदार कोण? असा सवाल या विद्यार्थ्यांनी विचारला. परीक्षेच्या काळात तरी परीक्षा केंद्रांच्या जवळपास मिरवणूक काढायला परवानगी नाकारली पाहिजे, अशी सूचना या विद्यार्थ्यांनी केली.
कचऱ्याच्या गाड्यांमुळेही होतो त्रासकचरा गोळा करण्यासाठी सकाळी ज्या गाड्या शहरात फिरतात, त्यावर मोठमोठ्या आवाजात चालू असणाऱ्या गाण्यांमुळेही मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. विशेषत: खडकेश्वर, नागेश्वरवाडी, औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेट, समर्थनगर या परिसरातील विद्यार्थ्यांना या आवाजाचा त्रास होत आहे. नव्या शहरात शिटी वाजवून नागरिकांना सूचित केले जाते; पण जुन्या शहरात मात्र कर्णकर्कश गाणी वाजविली जातात. परीक्षेच्या काळात तरी हा आवाज बंद करावा, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
बारावीची परीक्षा सुरूबारावीच्या बोर्ड परीक्षेला गुरुवारपासून (दि.२१) व दहावीच्या परीक्षांना १ मार्चपासून सुरुवात होत आहे. रस्त्यावरून निघणाऱ्या वरात, मिरवणुकीतील डीजेवर किमान या काळात तरी बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सुज्ञांनी तरी थोडे भान ठेवावेसध्या लग्नाचा व परीक्षेचा काळ आहे. लग्नामध्ये वºहाडी मंडळी आनंदाच्या भरात डीजे व बँडच्या तालावर ठेका धरतात. त्यामुळे वाहतूक तर खोळंबतेच; पण त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही खूप व्यत्यय येतो. सध्या अनेक ठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू आहेत. याचाही आवाज दिवसभर सुरू असतो आणि यामुळेही विद्यार्थ्यांना त्रास होतो. संबंधितांनी परीक्षेच्या कालावधीत तरी आपल्याकडून ध्वनिप्रदूषण होऊन विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. आमची शाळा शहराच्या ऐन मध्यवर्ती भागात असल्यामुळे, तर विद्यार्थ्यांना या आवाजाचा जास्तच त्रास होतो.-रवींद्र तायडे, मुख्याध्यापक, महाराष्ट्र हिंदी विद्यालय, शहागंज