गरिबांना खासगीत ४ लाख रुपये देणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:04 AM2021-05-19T04:04:36+5:302021-05-19T04:04:36+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव ...
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात जावे लागले. एका रुग्णाचे बिल जवळपास चार लाखांपर्यंत गेले. संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी राज्यशासनाने आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी मागणी आज जमात-ए- इस्लामी हिंदच्या औरंगाबाद शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्य शासनाने मागील दीड वर्षांत केलेली कामगिरी उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहे, परंतु ग्रामीण भागात आजही आरोग्य यंत्रणा मजबूत नाही. त्यामुळे नागरिकांना जीव वाचविण्यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. तेथील दर सामान्यांना परवडणारे नाहीत. प्रत्येक शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार झाले पाहिजेत, या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करावी. आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरणे, भविष्यासाठी औषधांचा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करून त्यांना लागणारे बालरोगतज्ज्ञ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची पूर्वतयारी करण्यात यावी.
लसीकरणाची गती वाढवावी व तळागाळातल्या लोकांपर्यंत लसीकरण पोहोचेल, असे नियोजन करावे, ऑनलाइन नोंदणीमुळे फक्त उच्चशिक्षित समाजच त्याचा लाभ घेत आहे. अल्पशिक्षित, मजूर, कामगार या लसीकरणापासून वंचित आहेत. शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष रिजवान-उर-रहमान खान, शहराध्यक्ष वाजेद कादरी, आबेद अली, काजी फैजान, कादरी अब्दुल हई, शेख मुखतार आदींचा समावेश होता.