चलनातून बाद केलेले ७५ कोटींचे मुद्रांक नष्ट करण्यास लागले २० तास
By विकास राऊत | Published: December 29, 2023 02:25 PM2023-12-29T14:25:01+5:302023-12-29T14:25:37+5:30
कोषागारात कारवाई, सकाळी सात वाजेपासून यंत्रणा लागली होती कामाला
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सुमारे ७५ कोटी १३ लाख रुपयांचे मूल्य असलेले मुद्रांक गुरुवारी सकाळी सात वाजेपासून जिल्हा कोषागार कार्यालयात (ट्रेझरी) गोपनीयरीत्या नष्ट करण्यासाठी सुमारे २० तास लागले. मशीनच्या साहाय्याने मुद्रांकांचे तुकडे करून ते जाळण्यात आले.
२०१४ पासून शासनाने चलनातून बंद केलेले ते मुद्रांक होते. एक ते २५ हजार किमतीच्या मुद्रांकांचा त्यात समावेश होता. १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक सध्या चलनात असून त्यापुढे ई-चलनाचा वापर होतो. दोन दशकांपासून कोषागार कार्यालयात मुद्रांकाचा साठा पडून होता. वीस वर्षांंनंतर कोषागारच्या ताब्यात असलेले मुद्रांक नष्ट करण्याचे आदेश शासनाने गेल्या महिन्यांत सर्व जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्हा मुद्रांक अधिकारी विवेक गांगुर्डे, कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरुवारी सकाळी सात वाजता ७५ कोटी १३ लाख रुपयांचे मुद्रांक नष्ट करण्यास सुरुवात केली.
२० वर्षांपूर्वी मुद्रांक घोटाळा झाला होता. घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्यामुळे शासनाने कोषागार कार्यालयात शिल्लक असलेले विनाक्रमांकाचे मुद्रांक पेपर विक्री न करण्याचे आदेश दिले होते. तेलगीच्या घोटाळ्यानंतर प्रत्येक मुद्रांक क्रमांकासह मिळत असून त्याचे डिझाइनही बदलले.
त्या मुद्रांक घोटाळ्याशी संबंध नाही...
तेलगी मुद्रांक घोटाळ्याशी याचा संबंध नाही, असा दावा कोषागार विभागाने केला. जुने मुद्रांक चलनातून बंद केल्यामुळे त्यांचे निश्चलीकरण (चलनातून बाद) करणे गरजेचे होते. त्यामुळे शासनाने पूर्ण राज्यातील ३ हजार कोटींचे मुद्रांक नष्ट करण्यासाठी गेल्या महिन्यात आदेश काढले. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील ७५ कोटी १३ लाख रुपयांचे मुद्रांक नष्ट करण्यात आल्याचे कोषागार सूत्रांनी सांगितले. मुद्रांक कस्टोडियनच्या देखरेखीत नष्ट केले. प्रधान मुद्रांक नियंत्रकांना त्याचा अहवाल पाठविल्यानंतरच सगळी यंत्रणा काेषागार कार्यालयाबाहेर पडली.
किती मूल्यांचे होते मुद्रांक?
मुद्रांक....................मूल्य
१ हजार रुपये..........१२ कोटी ९० लाख रु.
५ हजार रुपये............४६ कोटी ८० लाख रु.
१० हजार रुपये..........५ कोटी ९७ लाख रु.
१५ हजार रुपये..........१ कोटी ४६ लाख रु.
२० हजार रुपये..........६ कोटी रु.
२५ हजार रुपये...........२ कोटी रु.