औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात राष्ट्रीय कृषी बाजार ‘ई-नाम’ ला सुरुवात होणार आहे. यात प्रारंभी, प्राथमिक स्वरूपात बाजार समितीअंतर्गत आॅनलाईन हर्राशी होणार आहे. या अंतर्गत पारंपरिक रोखेच्या व्यवहाराऐवजी शेतकर्यांच्या थेट बँकेच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. जे अडत्या किंवा खरेदीदार आॅनलाईन व्यवहाराला विरोध करतील त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, हे विशेष.
शेतकर्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी, शेतीमालाला रास्त भाव मिळावा व बाजार समितीमधील व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार देशभर आॅनलाईन कृषी बाजार प्रकल्प राबवीत आहे. यासाठी ‘ई-नाम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात ३० बाजार समिती निवडण्यात आल्या त्यातील औरंगाबादेतील बाजार समिती एक आहे. तीन महिने झाले पण येथे ‘ई-नाम’ला सुरुवात झाली नाही. याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार बाजार समितीत आले होते. शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून येथे प्राथमिक स्वरूपात ‘आॅनलाईन हर्राशी’ सुरूकरा, असे आदेश त्यांनी दिले.
या संदर्भात बाजार समितीचे सचिव विजय शिरसाट यांनी सांगितले की, बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारात आजपर्यंत ४७९१ शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. त्यातील ३७९ शेतकर्यांनी ‘ई-नाम’ पोर्टलवर नोंदणी केली आहे. याशिवाय अडते व खरेदीदारांनीही पोर्टलवर नोंदणी केली आहे. केंद्र सरकारने कॉम्प्युटर व टेस्टिंग लॅब आदी सुविधांचा पुरवठा केला आहे. प्रत्येक सेल हॉलमध्ये स्वतंत्र केबिन तयार केली आहे. येत्या महिन्यात नवीन खरेदीदारांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
प्राथमिक स्वरूपात ई-व्यवहार धान्याच्या अडत बाजारात सकाळपासून आॅनलाईन-हर्राशीला सुरुवात. प्राथमिक स्वरूपात बाजार समिती अंतर्गत शेतीमालाची खरेदी-विक्री होणार. खरेदीदारांची मक्तेदारी मोडण्यासाठी नवीन खरेदीदारांनाही परवाने देणार. ‘ई-नाम’ची अट मान्य करणार्या अडत्या-खरेदीदारांचे परवाने नूतनीकरण करणार.
आॅनलाईन हर्राशी करण्यात अडचणीलिज्ड लाईन कृउबापर्यंत पोहोचली आहे. पण शासनाने नेमलेल्या कंपनीने कंपोनंटचा पुरवठा केला नाही. यामुळे ई-नामचे काम रखडले. बाजार समिती आता डोंगल वापरून आॅनलाईन हर्राशी सुरू करणार, पण ई-नाम पोर्टलवर स्पीड भेटत नाही. दैनंदिन आलेल्या शेतमालाची मॅन्युअली गुणवत्ता तपासणीसाठी वेळ लागणार.