जालना रोडचा पर्याय वर्षभरात होणार तयार; औरंगाबाद मनपाच्या स्थायी समितीत निविदा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:53 PM2018-01-12T13:53:09+5:302018-01-12T13:58:50+5:30
जालना रोडला पर्याय म्हणून कैलासनगर ते एमजीएम रस्त्याच्या डांबरीकरण कामाची १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३१ रुपयांची निविदा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली़ ए़ एस़ कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले असून, १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत आहे.
औरंगाबाद : जालना रोडला पर्याय म्हणून कैलासनगर ते एमजीएम रस्त्याच्या डांबरीकरण कामाची १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३१ रुपयांची निविदा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली़ ए़ एस़ कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले असून, १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत आहे़ हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर जालना रोडवरची वर्दळ ३० टक्के कमी होण्याची शक्यता आहे. शहर विकास आराखड्यात एमजीएम ते कैलासनगर हा रस्ता १८ मीटर रुंदीचा आहे. तत्कालीन आयुक्त डॉ़ पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात २०१२ मध्ये रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत या रस्त्यात बाधित असलेले अतिक्रमण हटविण्यात आले होते.
पाच वर्षांपासून काम रखडल्यामुळे त्या रस्त्याच्या कामासाठी १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३१ रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने गुरुवारी मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवली. ए. एस. कन्स्ट्रक्शनने अंदाजपत्रकीय दरापेक्षा ५़ ५५ टक्के इतक्या दराने निविदा भरली. त्यामुळे त्या संस्थेची निविदा मंजूर झाली. १२ महिन्यांत हा रस्ता पूर्ण करण्याची मुदत निविदेत आहे़ हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर जालना रस्त्याला पर्यायी असलेला हा रस्ता वरद गणेश मंदिर, समर्थनगर ते एमजीएम असा राहील.
दोन वर्षांपूर्वी शासनाने २४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात शहरासाठी उपलब्ध करून दिला़ त्यातून क्रांतीचौक ते महावीर चौकपर्यंत रस्ता करण्याचा निर्णय झाला़; परंतु नंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या योजनेतून करण्याचे ठरले. त्यामुळे ठेवलेला सहा कोटी रुपयांचा निधी कैलासनगर ते एमजीएम रस्त्यासाठी वळविण्यात आला. दुसर्या टप्प्यात शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून ५ कोटी रुपये राखीव त्यासाठी ठेवण्यात आले आहेत़
ते अडीच कोटी याच रस्त्यासाठी
अडीच कोटींचा निधी हा माजी महापौर भगवान घडमोडे यांच्या प्रभागातील विकास कामांसाठी वळविला आहे़ हा निधी वळविण्यात येऊ नये, अशी मागणी सदस्यांनी केली. शहर अभियंता एस. डी. पानझडे म्हणाले, घडमोडे यांच्या वॉर्डातील कामे मनपाच्या निधीतून होतील. वळविण्यात आलेला अडीच कोटींचा निधी याच रस्त्यासाठी वापरण्यात येईल. दर दोन महिन्यात या कामाचा आढावा स्थायी समिती बैठकीत सादर करावा, अशी सूचना सदस्यांनी प्रशासनाला केली.