जपानच्या पर्यटक महिलेस गोव्यात लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2016 12:53 AM2016-10-12T00:53:24+5:302016-10-12T01:12:51+5:30
औरंगाबाद : भारतात पर्यटनासाठी आलेल्या जपानी महिलेस गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी आणि बर्गरमधून गुंगीचे औषध देऊन तिचे किमती सामान लुटण्यात आले.
औरंगाबाद : भारतात पर्यटनासाठी आलेल्या जपानी महिलेस गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी आणि बर्गरमधून गुंगीचे औषध देऊन तिचे किमती सामान लुटण्यात आले. नियोजित प्रवासात औरंगाबादला आल्यानंतर तिने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. क्रांतीचौक पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे वर्ग केला.
क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, जपानची २५ वर्षीय महिला पर्यटनासाठी भारतात आलेली आहे. ५ आॅक्टोबर रोजी ती गोव्यात आली. तेथील एका २५ ते ३० वर्षे वयाच्या तरुणासोबत तिची ओळख झाली. त्या तरुणाने तिला गोवा पर्यटनासाठी मदतही केली. उत्तर गोवा भागातील पोरव्हरिम येथील एका रेस्टॉरंटमध्ये त्याच्यासोबत तिने कॉफी प्राशन केली आणि बर्गरही सेवन केले व तिची शुद्ध हरपली. काही वेळानंतर ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या बॅगेतील कॅनान कंपनीचा कॅमेरा, लॅपटॉप, महागडा हार्डडिस्क, रोख ८ हजार रुपये, १३० अमेरिकन डॉलर, जापनीज बँकेचे दोन क्रे डिट कार्ड आणि एक डेबिट कार्ड असा सुमारे ६८ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे आढळले. त्या महिलेने पूर्वनियोजित प्रवासासाठी खाजगी ट्रॅव्हल्स बसचे औरंगाबादचे तिकीट काढलेले होते. ही घटना उघडकीस आली तेव्हा तिच्यासोबत असलेला तो तरुण काही काळ गायब झाला होता. त्यानंतर तो पुन्हा तिला
भेटला.
औरंगाबादच्या बसमध्ये बसून देण्यासाठी तो आला होता. ही चोरी कोणीतरी चोरट्यांनी केली असावी, असे त्याने पर्यटक महिलेस सांगितले होते. औरंगाबादच्या गाडीचे तिकीट काढलेले असल्याने गोवा पोलिसांकडे तक्रार न देता तिने औरंगाबादला येणे पसंत केले.
ही चोरी तिच्यासोबत असलेल्या तरुणानेच केली असावी,अशी खात्री बस प्रवासात तिला पटली. त्यामुळे औरंगाबादेत उतरल्यानंतर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी पोरव्हरिम पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविला.