जायकवाडी धरण मृतसाठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:19 AM2019-03-23T00:19:42+5:302019-03-23T00:19:48+5:30

चिंता : उन्हाळाभर पाणी पुरविण्याची प्रशासनासमोर कसरत

 Jayakwadi dam dead | जायकवाडी धरण मृतसाठ्यावर

जायकवाडी धरण मृतसाठ्यावर

googlenewsNext

पैठण : एकीकडे जागतिक जल दिन साजरा करण्यात येत असताना अगदी याच दिवशी दुसरीकडे जायकवाडी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात गेली. जागतिक जलदिनी जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा संपल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करा, असाच हा जुळून आलेला योगायोग सांगत तर नसावा. जायकवाडीचा मृतसाठा लक्षात घेता उन्हाळाभर पाणी पुरविण्यासाठी जायकवाडी प्रशासनास कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.
जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा संपून धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात गेली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली असून, सकाळी ७ नंतर मृतसाठ्यातून उपसा करण्यात येत आहे. मृतसाठ्यात ३० टक्के गाळ असल्याने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाण्याच्या नियोजनाची कसरत जायकवाडी प्रशासनास पेलावी लागणार आहे.
जायकवाडी धरणात यंदा ४७.५० टक्के जलसाठा (उर्ध्व भागातील धरणातून सोडलेले पाणी मिळून) झाला होता. या वर्षात जायकवाडीच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थितीमुळे जायकवाडीतून औरंगाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यांतील बंधाऱ्यांसाठी पाणी सोडावे लागले. परळी थर्मलसाठी अतिरिक्त पाणी सोडावे लागले, सिंचनासाठी नियमित रोटेशन देण्यात आले. त्यातच गेल्या ८ दिवसांपासून बाष्पीभवन प्रक्रियेत वाढ झाल्याने अपेक्षेपेक्षा लवकर यंदा जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा संपुष्टात आला. डाव्या व उजव्या कालव्यातून सुरू असलेला विसर्ग २० मार्च रोजी बंद करण्यात आला, असे दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.
मृतसाठा कसा पुरणार?
जायकवाडीच्या मृतसाठ्यात ७३८ दलघमी एवढा जलसाठा असून, यात आज रोजी ३० टक्के गाळ आहे. यानुसार २२१ दलघमी पाणी गाळाने कमी झाले आहे. म्हणजे फक्त ५१६ दलघमी पाणी मृतसाठ्यात असून, यापैकी फक्त ३५० दलघमी पाण्याचा उपसा करता येतो. सिंचन, औद्योगिक वसाहत, पाणीपुरवठा, आपत्कालीन पुरवठा व तापमानात वाढ झाल्याने प्रतिदिन १ दलघमी होणारे बाष्पीभवन यामुळे जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी प्रशासनास कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title:  Jayakwadi dam dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.