पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठा ९५% पेक्षा जास्त झालेला असताना पाणलोटक्षेत्रातून १,३८,००० क्युसेस अशी मोठ्या क्षमतेने आवक सुरू असल्याने जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे बुधवारी सकाळी अकरा वाजून सात मिनिटांनी अर्धा फुटाने वर उचलून ९४३२ क्युसेसने गोदापात्रात विसर्ग सुरु करण्यात आला. आवक लक्षात घेता टप्याटप्याने विसर्गात वाढ केली जाईल असे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान गोदावरी पात्रात विसर्ग केल्याने गोदावरी दुथडी भरून प्रवाही झाली आहे. सलग तीसऱ्या वर्षी धरणातून विसर्ग करण्यात आला आहे.
गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरु करण्यात आल्याने प्रशासनाच्या वतीने गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणात एक लाख ३८ हजार क्युसेसने पाण्याची आवक सुरु असून धरण ९५ टक्के भरल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने आज धरणातून विसर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते धरणात दाखल झालेल्या नविन पाण्याचे विधीवत जलपुजन करुन दरवाजे उघडण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी गव्हाणे,मुख्य अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उप कार्यकारी अभियंता प्रेरणा बागुल, ज्ञानदेव शिरसाट, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, न.प. मुख्याधिकारी संतोष आगळे, शाखा अभियंता विजय काकडे, बंडु अंधारे, गणेश खराडकर, राजाराम गायकवाड आदी उपस्थिती होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून जायकवाडी धरणात पाण्याची सातत्याने जोरदार आवक होत असून बुधवारी सकाळी जवळपास १३८००० क्युसेस क्षमतेने धरणात आवक सुरू झाली त्यातच धरणाचा जलसाठा ९५% पेक्षा जास्त झाला, यामुळे तातडीने सकाळी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार धरणाचे १० ते २७ या क्रमांकाचे दरवाजे सहा ईंचाने वर उचलून प्रतेकी ५२४ क्युसेस असा एकूण ९४३२ क्युसेस विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाचे पाणी धरणात दाखल होत असताना नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील दारणा ४३१६, गंगापूर १०५२१कश्यपी २१५० व नांदूरमधमेश्वर वेअर मधून ४५०८२ क्युसेस असा मोठा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला आहे. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातील भंडारदरा ५५४०, नीळवंडे ७१३३ ,ओझर वेअर ५७११ व मुळा धरणातून ३२५५ क्युसेस असा विसर्ग प्रवरा नदीत करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार असल्याने बुधवारी सायंकाळ पर्यंत जायकवाडी धरणातून टप्याटप्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पुर आला असून गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.