लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही, शिवाय २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ते धावतील हे अशक्यच आहे, असेही तुम्ही म्हणाल; मात्र ‘जिद्द असली की, मैदानही अपुरे’ अशी नवी म्हण तयार करायला ते सज्ज झाले आहेत. हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील काही ज्येष्ठ नागरिक ‘लोकमत’तर्फे रविवारी औरंगाबादमध्ये होत असलेल्या महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. यामध्ये अगदी पंचाहत्तरी गाठलेलेही तरुणतुर्क आहेत.आश्चर्य वाटले ना! हो... बायपास झालेल्या तरीही शरीरात प्रचंड ऊर्जा असलेल्या बारा ते तेरा जणांचा हा ग्रुप रविवारी अगदी पहाटेच औरंगाबादच्या गारखेडा भागातील विभागीय क्रीडा संकुलावर धावण्यासाठी सज्ज राहणार आहे. बायपास सर्जरी झाल्यानंतर आपण समाजावर आणि परिवारावर ओझे होऊ का, अशी मनात भीती न बाळगता ही मंडळी धावायला लागली. त्यांना व्यंकटरमण पिचुमणी यांंचे मार्गदर्शन लाभले आणि आता हा बारा-तेरा जणांचा ग्रुप देशभरातील विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो.या ग्रुपमधील सदस्यांनी लोकमत भवन येथे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली. औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये धावण्याच्या भूमिकेबाबत या ज्येष्ठ नागरिकांनी चर्चाही केली.बायपास सर्जरी झाली म्हणजे आपल्या हालचालींवर मर्यादा आल्या, असेच अनेक जण समजतात; मात्र या समजाला छेद देण्याचे काम या ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे. बायपास झाली म्हणजे स्वत:ला आजारी समजणारे, तसेच व्हीलचेअरचा वापर करणारेही अनेक जण दिसतात. या सर्वांना ऊर्जा देण्याचे आणि मनात ऊर्मी भरण्याचे काम या ग्रुपतर्फे होताना दिसत आहे.अर्थात महामॅरेथॉनमध्ये धावणारी ही सर्व मंडळी अतिशय ताजीतवानी असल्याचे दिसले. गेल्या काही दिवसांत किंवा वर्षांत धावण्याच्या सरावामुळे ही मंडळी शारीरिकदृष्ट्या अगदी ‘फिट’ आहेत आणि मनानेही तरुण आहेत. नियमित ‘एक्सरसाईज’ आणि ‘चिअरफुल लाईफ’ असे त्यांचे जगणे आहे. यापैकी अनेक जण स्वत:चा व्यवसायही उत्तमपणे सांभाळत आहेत.या ग्रुपमधील व्यंकटरमण पिचुमणी वगळता सर्वच सदस्य हे बायपास सर्जरी झाल्यानंतर धावायला लागले. सर्जरी होण्याआधी यांच्यापैकी कुणीही धावत नव्हते आणि आता तर अगदी प्रोफे शनल मॅरेथॉनमध्ये ते धावत आहेत. मनात जिद्द असली की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याची प्रचीती या ग्रुपने आणून दिली आहे. याचे श्रेय मार्गदर्शक व्यंकटरमण पिचुमणी यांना आणि या ज्येष्ठांच्या जिद्दीला जाते. तरुणांना लाजवेल आणि ज्येष्ठांना मार्गदर्शक ठरेल, अशीच या ग्रुपची (पान २ वर)ग्रुपमधील प्रत्येक सदस्यांत ऊर्जाया ग्रुपमधील प्रत्येक सदस्य प्रचंड ऊर्जेने भारावलेला आहे. माझी २००७ मध्ये बायपास सर्जरी झाली. सर्जरीआधीही मी पळत होतो. सर्जरी झाल्यानंतर काही दिवसांनी मी माझे रनिंग कायम ठेवले. मी धावतोय, मग इतर का धावू शकणार नाहीत, असा विचार मनात आला. आता मी ६१ वर्षांचा आहे. आता अनेकजण आमच्या ग्रुपमध्ये जॉईन झाले आहेत.- व्यंकटरमण पिचुमणी, मार्गदर्शक
जिद्द असली की मैदानही अपुरे! बायपास होऊनही ते धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 1:03 AM