जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 05:59 PM2019-04-17T17:59:10+5:302019-04-17T17:59:46+5:30
मे महिन्यापासून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता धूसर
औरंगाबाद : जेट एअरवेजची मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा कधी पूर्ववत होते, याकडे अवघ्या शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. मात्र, या विमानाची मे महिन्यासह पुढील बुकिंग सध्या ठप्प आहे. त्यामुळे ही विमानसेवा मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. शिवाय विमानसेवा कायमस्वरूपी ठप्प होण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान प्रारंभी ३१ मार्चपर्यंत रद्द केले. त्यानंतर २३ मार्चपासून सकाळचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानही रद्द करण्यात आले. सकाळच्या वेळेतील मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानाचे ३१ मार्चपासून पुन्हा उड्डाण सुरू होणार होते; परंतु या विमानाचे उड्डाण लांबणीवर पडले. ही विमानसेवा पुन्हा कधी सुरू होते, याकडे नुसते डोळे लावून बसण्याची वेळ येत आहे, तर दुसरीकडे जेट एअरवेजवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. विमान प्रवासासाठी अनेक दिवसांपूर्वी बुकिंग करण्याची सुविधा असते. आजघडीला जेट एअरवेजच्या मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानाची पुढील काही महिन्यांची बुकिंग बंद आहे. याविषयी जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
बुकिंग बंद
प्रवाशांकडून विचारणा होत आहे; परंतु जेट एअरवेजची पुढील महिन्यातील बुकिंगच होत नाही. त्यामुळे सध्या व्यवसायावरदेखील परिणाम होत आहे, असे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक आसिफ खान म्हणाले.
फ्लाईट दिसतच नाही
सध्या जेट एअरवेजच्या मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानाची पुढील महिन्यांतील बुकिंग बंद आहे. आमच्या पोर्टलवर फ्लाईट दिसतच नाही. त्यामुळे नागरिक पुढील नियोजनदेखील करीत नाही. एअर इंडिया, रेल्वेला प्राधान्य देण्याचे प्रमाण वाढले आहे, असे ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष आशुतोष बडवे म्हणाले.
...तर विमान सुरू होईल
जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान कधीपासून सुरू होईल, याची काहीही माहिती मिळत नाही. त्याची बुकिंगदेखील बंद आहे. त्यांचे आर्थिक संकट दूर झाले तर मेपासून विमानसेवा सुरू होऊ शकते, असे औरंगाबाद टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग म्हणाले.
काहीही कळविले नाही
औरंगाबाद-मुंबई-औरंगाबाद विमान कधीपर्यंत सुरू होईल, याविषयी जेट एअरवेजकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले.