औरंगाबाद : प्रसिध्द बुध्द-भीम गायिका कडूबाई खरात यांना दोन महिन्यांपूर्वी घर देण्याचे आश्वासन पूर्ण करून कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज घराची चावी प्रदान केली. या प्रसंगी कडूबाई भावूक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी ’आजचा प्रसंग गोड आहे. कडूबाईच्या घरभरणीसाठी सारेजण आला आहात. आजपासून कडूबाई या साखराबाई म्हणून ओळखल्या जातील’ असे घोषित केल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. कडूबाईंनीही हे नाव मान्य असल्याचे पत्रकारांना सांगितले.
भीमशक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, काँग्रेसच्या सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विष्णू शिंदे, दिनकर ओंकार यांचीही भाषणे झाली. किरण पाटील-डोणगावकर यांनी प्रास्ताविक, राहुल सावंत यांनी संचालन केले. जगन्नाथ काळे यांनी आभार मानले. मंचावर माजी आ. सुभाष झांबड, अनिल पटेल, मुजाहेदभाई, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, झाल्टा- सुंदरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा शिंदे. डॉ. अरुण शिरसाट, नामदेव पवार, हिशाम उस्मानी, विलास औताडे, सीमा थोरात, सुरेखा पानकडे, सरोज मसलगे आदींची उपस्थिती होती.
इंदिरा माय जन्माला या हो पुन्हा.....कडूबाई खरात यांनी आपल्या गोड गळ्याच्या गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘इंदिरा माय जन्माला या हो पुन्हा’ या गाण्याने त्यांनी इंदिरा गांधी यांची आठवण ताजी केली, तर ‘बहुजनांचे धनी..पटोले साहेबावानी, हंडोरेसाहेबावानी’ या शब्दांतून या दोघांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. ‘एकजुटीने मतदान या पंजाला द्यायचं’ या गीतातून काँग्रेसबद्दलचा जिव्हाळा व्यक्त केला. ज्या गाण्याने त्या प्रसिध्द झाल्या ते‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं’ हे गाणं उपस्थितांनी डोक्यावर घेतलं. कडूबाईंवर पुष्पवृष्टी होत राहिली. महिलांनी नृत्याचा ठेका धरला.
दु:ख आणि वेदनांचा भाजप उत्सव करते लोकांच्या दु:ख आणि वेदनांचा भाजप उत्सव साजरा करीत आहे. देश विकणाऱ्यांची छाती ५६ इंची असूच शकत नाही. देश आणि संविधान वाचविण्यासाठी मनुवाद्यांना उखडून फेकण्यासाठी कटिबध्द झाले पाहिजे, असे आवाहन सोमवारी येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.