कलारंगच्या ‘काव्यधारा’: तू पत्र जाळल्यावर मी राख झालो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 07:32 PM2018-02-27T19:32:47+5:302018-02-27T19:33:57+5:30
प्रेमाचा कायम ‘अनुशेष’ राहिलेल्या तरुणांच्या दु:खापासून ते पोराबाळांसाठी मरमर करणार्या आई-बापाच्या उतारवयातील यातना मांडणार्या कवितांचा शहरवासीयांनी अस्सल साहित्यानंद लुटला.
औरंगाबाद : प्रेमाचा कायम ‘अनुशेष’ राहिलेल्या तरुणांच्या दु:खापासून ते पोराबाळांसाठी मरमर करणार्या आई-बापाच्या उतारवयातील यातना मांडणार्या कवितांचा शहरवासीयांनी अस्सल साहित्यानंद लुटला. निमित्त होते कलारंग सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित ‘काव्यधारा’ या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे.
तापडिया नाट्यमंदिरात मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.२६) पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यभरातील नऊ निमंत्रित कवींनी सहभाग नोंदविला. खालापूरच्या विशाल उशिरेने ‘बाप’ नावाच्या कवितेतून घामात अश्रू लपविणार्या बापाची कहाणी मांडत सुरवात केली. बापावर लिहायचे राहून गेल्याची सल व्यक्त करताना तो म्हणतो, ‘आमचे मळे फुलवले, पण तुझे शिवार करपले.’ पोराबाळांसाठी कायमच तोट्यात जाणारा बाप मोठा व्यापारी, या शब्दांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. बेळगावच्या पूजा भडांगे हिने ‘पानाच्या अंगावरती शहारलेला काटा गं’ कविता सादर केली.
रायगडचा युवा गझलकार बंडू अंधेरेने प्रिया प्रकाश वॉरियरचा संदर्भ देत सुरुवात केली, ‘तिच्या रोखून नजरेला नजर, मी चाललो होतो, तिने मारला डोळा, मी लाजलो होतो.’ यावर तरुण रसिकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहाचा ‘माहोल’च ढवळला . प्रेमवीरांना ‘ठेवू नको इतका विश्वास पापण्यावर’ असा सल्ला देताना तो म्हणाला, ‘तू पत्र जाळल्यावर मी राख झालो.’ प्रेमात ‘कमनशिबी’ ठरलेल्यांचे दु:ख शब्दांत कैद करीत कोल्हापूरचा उमेश सुतार म्हणाला की, ‘तुझ्या आठवणी छळत नाही मला, तुझ्या आठवणींना मीच छळतो.’ ‘तोवर प्रेम करीन’ या कवितेत तो म्हणतो, ‘माझ्या प्रेमाची बँक सतत बुडीत आहे, सव्याज परतफेड करेपर्यंत प्रेम करीन मी, काळजाचे ठोके नाराज होईपर्यंत प्रेम करीन मी.’
तसेच मुंबईची यामिनी दळवी, यवतमाळची स्नेहा ढोल, अंबाजोगाईचा अविनाश भारती, हिंगोलीचा ध. सू. जाधव आणि स्थानिक कवी नीलेश चव्हाण यांनीही कविता सादर केल्या. निवेदक नीलेश चव्हाणने नीरव मोदीपासून ‘पकोड्या’पर्यंत कोपरखळ्या मारत सर्वांना खळखळून हसविले.